Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गद्दारांच्या साथीने मुंबई जिंकण्याचे दिवास्वप्न, काँग्रेसची जे. पी. नड्डा यांच्यावर टीका

गद्दारांच्या साथीने मुंबई जिंकण्याचे दिवास्वप्न, काँग्रेसची जे. पी. नड्डा यांच्यावर टीका

Subscribe

मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव करत विधानसभेवर विजयी पताका फडकवली आहे. शिमला महानगरपालिकेतही भाजपाचा काँग्रेसने पराभव केला. त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात भाजपाचा एकही उमेदवार ते निवडून आणू शकले नाहीत. कर्नाटकातही नड्डांच्या भाजपाचा सुपडासाफ झाला. नड्डा म्हणजे पराभव, हे चित्र स्पष्ट असताना काही गद्दारांच्या साथीने मुंबई महानगरपालिका जिंकण्याचे दिवास्वप्न जे. पी. नड्डा पहात आहेत, अशी बोचरी टीका प्रदेश काँग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe Patil) यांनी गुरुवारी केली.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जे. पी. नड्डा हे बुधवारी मुंबईत आले होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) कार्यकाळात मुंबई, महाराष्ट्रातील विकास रखडला होता, प्रकल्पांची कामे बंद होती. मात्र, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर या विकासकामांना, प्रकल्पांना वेग आला आहे, असे जे. पी. नड्डा यांनी स्पष्ट केले. तसेच, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत (BMC election) भाजपचाच महापौर विराजमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

- Advertisement -

यावर अतुल लोंढे यांनी आज, गुरुवारी टीका केली. भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला देशभरातील जनता कंटाळलेली आहे. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचारात भाजपा आकंठ बुडालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जनता प्रतिसाद देत नाही तर जे. पी. नड्डा यांना कोण प्रतिसाद देणार? परंतु राणा भीमदेवी थाटात मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या वल्गना ते करत आहेत, अशी खिल्ली लोंढे यांनी उडविली.

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या कांदिवलीमधील कार्यक्रमाला 100 माणसेही उपस्थित नव्हती. जे पी. नड्डांना त्यांचे गृहराज्य हिमाचल प्रदेशने स्वीकारले नाही तर, मुंबईची जनता त्यांना कशी साथ देईल? भाजपा आणि जे. पी. नड्डा यांनी कितीही जोर लावला तरी, मुंबई महानगरपालिका जिंकणे त्यांना शक्य नाही. मुंबईकर जनता भाजपचे राजकारण ओळखून आहे ते त्यांना थारा देणार नाहीत, असा दावाही अतुल लोंढे यांनी केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -