घरमहाराष्ट्र४८ तासांत मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पट

४८ तासांत मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पट

Subscribe

मुंबई महापालिका सतर्क * विभागस्तरावर प्रत्येकी दोन पथके

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा राज्यात वेगाने प्रादुर्भाव होत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीच्या कोरोनाच्या दोन लाटांमध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतही सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेने ट्विट करुन गेल्या तीन दिवसांतील नव्या रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार गुरुवारी मुंबईत ६०२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी ४९० रुग्णांची नोंद झाली होती. २१ डिसेंबर म्हणजेच मंगळवारी मुंबईत ३२७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा पुन्हा एकदा वेगाने फैलाव होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने नाताळ साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत ६०२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत सात लाख ४६ हजार ९९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा कोरोनामुक्त रुग्णांचा दर ९७ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या २८१३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईचा कोरोना दुपटीचा दर १७४७ दिवस इतका आहे.

नाताळ सणासाठी नियमावली
अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या नाताळवर देखील ओमायक्रॉनचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने सण साजरे करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. तसेच नाताळसाठी नियमावली देखील शासनाने जाहीर केली आहे.

- Advertisement -

१) ख्रिश्चन बांधवांनी या वर्षी देखील नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करावा.

२) चर्चमध्ये येणार्‍या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक.

३) फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये.

४) चर्चच्या बाहेर परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नये.

५) कोणत्याही प्रकारे गर्दीला आकर्षित करणार्‍या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि मिरवणुकीचे आयोजन करू नये.

६) कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी.

७) स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या मासमध्ये ५० टक्के लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहण्यास जास्त जणांचा समावेश नसावा.

८) सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासोबतच चर्च परिसराचे नियमितपणे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करणे अनिवार्य

दरम्यान, महापालिकेमार्फत २४ विभागस्तरांवर प्रत्येकी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार प्रत्येकी दोन पथके वाढविण्याची तयारी पालिकेने ठेवली आहे. ही पथके त्या त्या विभागांतील हॉटेल, बंदिस्त सभागृह, मोकळ्या जागेतील कार्यक्रम यावर लक्ष ठेवून असणार आहे. या ठिकाणी निश्चित करण्यात आलेल्या क्षमतेएवढे अथवा त्यापेक्षा कमी लोकांची हजेरी असणे अपेक्षित आहे. तसेच मालक, कर्मचारी, ग्राहक यांच्या तोंडाला मास्क आणि सुरक्षित अंतर असणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून सुधारित नियमावली येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -