घरCORONA UPDATEकोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीला दफनभूमीत दफन करण्यास नकार!

कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीला दफनभूमीत दफन करण्यास नकार!

Subscribe

कोरोना’मुळे मृत्यू पावलेल्या मालाडमधील ६५ वर्षी मुस्लिम व्यक्तीला दफनभूमीत दफन करण्यासच विश्वस्तांनी नकार दिल्यामुळे अखेर त्या व्यक्तीवर विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘कोरोना’मुळे मृत्यू पावलेल्या मालाडमधील ६५ वर्षी मुस्लिम व्यक्तीला दफनभूमीत दफन करण्यासच विश्वस्तांनी नकार दिल्यामुळे अखेर त्या व्यक्तीवर विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनामुळे मृत्यू पावल्यानंतर, मृताच्या नातेवाईकांनी मालाड-मालवणीतील दफनभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेले असता, कोरोनाग्रस्त असल्यामुळे दफन करण्यास नकार  दिला. त्यामुळे अखेर बोरीवलीतील दौलत नगर विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मालाडमधील कोरोनाग्रस्त असलेल्या ६५ वर्षीय मुस्लिम व्यक्तीवर जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरु होते. या व्यक्तीचे बुधवारी निधन झाले. निधनानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मुलाने तसेच नातेवाईकाने सर्व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी पहाटे मालाड-मालवणी येथील दफनभूमीत घेवून गेले असता, दफनभूमीतील ट्रस्टने त्यांना दफन करण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर विश्वस्तांनी दर्शवलेला विरोध आणि नातेवाईकाने दफनभूमी ऐवजी विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवल्यामुळे अखेर उपलब्धतेनुसार बोरीवलीतील दौलत नगर स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आहे.

- Advertisement -

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्तांचा मृत्यू  झाल्यास त्याचे पार्थिव दफन न करता दहन केले जावे, असा निर्णय घेतला होता. परंतु याला मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी तीव्र विरोध केल्यानंतर या परिपत्रकामध्ये काही सुधारणा करत परिस्थितीनुसार निर्णय घेवून अंत्यसंस्कार घेतले जावे, असे निर्देश दिले होते. आयुक्तांच्या या परिपत्रकानुसार दफन करण्यात येणाऱ्या पहिल्या करोनाग्रस्ताला दफनभूमीतील ट्रस्टनेच विरोध दर्शवल्यामुळेच विद्युत दाहिनीत दहन करावे लागले. त्यामुळे मुस्लिम समाजाने, कोरोनाग्रस्त मृत व्यक्तीला दफन न करता दहन करणेच योग्य असल्याचे समजून एकप्रकारे महापालिकेला सहकार्य केले असल्याची भावना समोर येत आहे.

मृतांच्या मुलाच्या म्हणण्यानुसार, माझ्या वडिलांना रुग्णालयात मृत घोषित केल्यानंतर कोणीही मला मदत करायला पुढे आले नाही. मी रुग्णालयाबाहेर प्रेताजवळ तीन तास बसलो. आम्हाला त्यांचे अंत्यसंस्कार मालाड मालवणीतील दफनभूमीत दफन करायचे होते. परंतु जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा विश्वस्तांनी आम्हाला वडिलाचे पार्थिव दफन करण्यास नकार दिला. कारण ते कोरोनाग्रस्त असल्याचे कारण दिले. त्यानंतर पोलिस आणि अन्य अधिकाऱ्यांसह समाजातील लोकांनी हस्तक्षेप करत आम्हाला हिंदु स्मशानभूमीत पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. त्यानुसार विद्युत दाहिनीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .

- Advertisement -

मालाडचे स्थानिक आमदार व उपनगराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार,  सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे एखाद्या मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह जागेच्या जवळच्या स्मशानभूमीत दफन केले पाहिजे. परंतु या प्रकरणामध्ये मृताच्या कुटुंबीयांनी मृतदेह थेट मालाड मालवणी दफनभूमीत नेले. परंतु तिथे नेताना याची कोणतीही कल्पना विश्वस्तांना दिली नाही आणि मग मृतदेह दफन करण्याची मागणी केली. सरकारी मार्गदर्शक सूचना असूनही मृतदेह मालाड मालवणी स्मशानभूमीत नेण्यास ज्या अधिकाऱ्याने परवानगी त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

पी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मालवणीतील दफनभूमीत दफन करण्यासाठी मृतदेह आणला असता विश्वस्तांनी नकार दिला. मात्र, कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे मृतदेह अधिक काळ ठेवता येत नसल्यामुळे नातेवाईक आणि समाजातील लोकांच्या परवानगीने बोरीवलीतील विद्युतदाहिनी रिकामी असल्यामुळे तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -