घरदेश-विदेशकरोनाचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका

करोनाचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका

Subscribe

हजारो कामगारांच्या नोकर्‍या धोक्यात, ३० टक्के पगार कपातीचा निर्णय

देशभरात फोफावत असलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वात मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. भारताबाहेर आणि देशांर्तगत अनेक सहलींचे आयोजन रद्द करावे लागल्यामुळे टुर्स कंपन्यांना ७० ते ८० टक्के फटका बसला असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेल्या हा व्यवसाय आता करोना मंदीच्या छायेत आला असून अनेक टुर्स कंपन्यांनी ३० ते ५० टक्के पगार कपातीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे,अनेक खासगी टुर्स कंपन्यांनी या मंदीचा फटका बसू नये म्हणून कर्मचार्‍यांकडून करारनामा लिहून घेत पुढील काही वर्षे नोकरी न सोडण्याचे लेखी आश्वासन घेतल्याने कर्मचार्‍यांसमोर नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

जगभरात सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यात बुधवारपर्यंत करोनाचे ४१ रुग्ण आढळून आले असून संशयित रुग्णांची संख्या ही ८०० वर पोहचली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने परदेशातून भारतात येणार्‍यांमध्ये अधिक असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून देशात आणि देशाबाहेर आयोजित करण्यात आलेल्या जवळपास सर्वच सहलींचे आयोजन रद्द केले आहे. तर देशाबाहेर सहलींचे आयोजन करु नये, असे आदेश राज्य सरकारने देखील दिले आहेत. त्यामुळे त्याचा थेट फटका टुर्स कंपन्यांना बसला असून गेल्या दोन आठवड्यापासून जवळपास सर्वच सहलींचे आयोजन रद्द केले आहेत. काहींनी आपल्या सहलींच्या वेळा पुढे ढकलल्या असल्या तरी सध्याच्या परिस्थितीमुळे पर्यटन व्यवसायासमोर मंदीचे ढग पसरले आहेत.

- Advertisement -

करोनामुळे आतापर्यंत पर्यटन व्यवसायाला मोठा तोटा सहन करावा लागला असून पर्यटन क्षेत्राला आतापर्यंत ४०० कोटींचा फटका बसल्याची माहिती पुढे आली आहे. अवघ्या महिन्याभरात हा तोटा सहन करावा लागला असल्याने पर्यटन क्षेत्रातील कर्मचार्‍यांसमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. मुंबईतील जवळपास सर्वच टुर्स कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारात सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक कर्मचार्‍यांनी राजीनामाअस्त्र वापरण्यास सुरुवात केली असल्याने टुर्स कंपन्यांसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना रोखण्यासाठी आता टुर्स कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांकडून करारनामा लिहून घेत असून पुढील दोन ते चार वर्षे इतर कोणत्याही टुर्स कंपनीत नोकरी करणार नाही, असे लिहून घेत त्यांचा अटकाव करण्याचा प्रयत्न सुरु केले आहेत.

इकडे आड तिकडे विहीर

याबद्दल बोलताना मुंबईतील एका नामांकित टुर्स अ‍ॅण्ड टॅव्हल कंपनीमध्ये काम करणार्‍या एका कर्मचार्‍याने सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून पर्यटन व्यवसायला जास्त फटका बसला आहे. त्यामुळे टुर्स कंपन्यांनी पगार कपातीचा निर्णय घेतला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता या पगारकपातीचे समर्थन केल्याशिवाय आम्हा कर्मचार्‍यांपुढे कोणताही उपाय नाही. तर दुसरीकडे अनेकांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहेे. पण आता कंपन्यांनी करारनाम्याची भिती दाखवित कर्मचार्‍यांना थांबविण्यासाठी विविध आयडियाच्या कल्पना लढविल्या आहेत. त्यामुळे आमच्याकडे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. करानोमुळे जे काही झाले आहे. त्याचा चुकीचा पद्धतीचा वापर टुर्स कंपन्यांकडून केला जात असल्याची खंत या कर्मचार्‍यांकडून ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -