घरमहाराष्ट्रसोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू

सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू

Subscribe

राज्य सरकारचा निर्णय, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग आटोक्यात असल्यामुळे अखेर मागील 2० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवार 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. ज्या भागात कोरोना रुग्ण संख्या कमी आहे तेथे शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

पालकांच्या संमतीनुसारच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल. पहिली ते बारावी तसेच पूर्व प्राथमिक शाळेचे वर्ग सुरु करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाला निर्णय घ्यायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महापालिका स्तरावर आयुक्त तर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी शाळा सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत .

- Advertisement -

मुलांची सुरक्षितता हीच प्राथमिकता
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, परिस्थिती नियंत्रणात असलेल्या ठिकाणी कोरोनासंबंधी सर्व नियमांचे काटेकारपणे पालन करूनच शाळा सुरू करण्यात येतील. एकाने निर्णय घेतला म्हणजे दुसर्‍याने घेतलाच पाहिजे असे नाही. मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही आमची प्राथमिकता राहिलेली आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे शाळेत जाऊन लसीकरण करता येईल का, हे आम्ही पाहत आहोत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मार्च २०२० मध्ये राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर ऑगस्ट २०२१ पासून टप्प्य्टप्प्याने राज्यतील शाळा सुरु करण्यात आल्या. त्यानंतर कोरोना नियंत्रणात आल्यानंतर १ डिसेंबर २०२१ पासून मुंबईसह राज्यभरात पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सरसकट सुरु झाल्या.

- Advertisement -

मात्र, डिसेंबरच्या अखेरीस कोरोना रुग्णसंख्या वाढून तिसरी लाट सुरु झाल्यानंतर ३ जानेवारी २०२१ पासून पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या स्थिरावल्यानंतर शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, शिक्षक आणि पालक वर्गाकडून होत होती. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने २४ जानेवारीपासून शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मान्यता दिली. त्यामुळे जवळपास २० दिवसाच्या खंडानंतर शाळेची घंटा पुन्हा वाजणार आहे.

महाविद्यालये सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : उदय सामंत
दरम्यान, राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून तसा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे

मुंबईतील शाळा 27 जानेवारीपासून
राज्यातील शाळा सोमवारवारपासून सुरू होणार असल्या, तरी मुंबई महापालिकेला शाळा सुरू करण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे. मागील वेळी जारी केलेले नियम यावेळीही शाळा सुरू ठेवण्यासाठी लागू राहतील. मुंबईतल्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईत ऑफलाईन बरोबरच ऑनलाईन शाळाही सुरू राहील, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले.

राज्यातील सव्वा दोन कोटी विद्यार्थी जाणार शाळेत
24 जानेवारीपासून सुरू होणार्‍या शाळांमध्ये राज्यातील 2 कोटी 30 लाख 54 हजार 347 विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. यामध्ये सरकारी शाळांमध्ये 56 लाख 46 हजार 319, खासगी शाळांमध्ये 66 लाख 63 हजार 311, अनुदानित शाळांमध्ये 1 कोटी 5 लाख 88 हजार 760 तर अन्य शाळांमध्ये 1 लाख 55 हजार 967 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिशु वर्गामध्ये 8 लाख 79 हजार 732, पहिली ते चौथीच्या वर्गामध्ये 98 लाख 45 हजार 508, पाचवी ते सातवीच्या वर्गामध्ये 58 लाख 48 हजार 34, आठवी ते दहावीच्या वर्गामध्ये 37 लाख 5 हजार 6 आणि अकरावी ते बारावीच्या वर्गामध्ये 27 लाख 76 हजार 077 इतके विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे राज्यामध्ये एकूण शाळा व कनिष्ठ महाविद्यालये 1,10,229 असून एकूण शिक्षकांची संख्या 7,83,847 इतकी आहे.

शाळेत लसीकरण करण्याचा निर्णय
१५ ते १८ वयोगट म्हणजे नववी, दहावी आणि अकरावीच्या वर्गातील मुलांचे शाळेत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांचे शाळेत लसीकरण करताना संपूर्ण काळजी घेतली जावी, अशी चर्चाही मंत्रिमंडळ बैठकीत झाली. राज्यात १५ ते १८ वयोगटातील ५० टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे. त्याला आता गती मिळेल. लसीकरणाबद्दल पालकांमध्ये संभ्रम असण्याचे कोणतेही कारण नाही. लहान मुलांच्या शिक्षणावर तसेच मनोविकासावर कुठल्याही प्रकारचा विपरित परिणाम होणार नाही.
-राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मुंबईतही शाळा उघडणार
कोविड नियमांचे पालन करत मुंबईतील शाळा देखील २४ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे.

सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर आता शाळांमध्येही लहान मुलांची लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच मुलांच्या लसीकरणाबद्दल संभ्रम बाळगण्याचे कारण नाही, असेही राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना स्थितीबद्दलचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लसीकरणावर जोर दिला गेला पाहिजे, यावर बैठकीत भर देण्यात आला आहे. आजही लसीचा पहिला डोस आणि दुसरा डोस यामध्ये राज्यातील काही जिल्हे मागे पडले आहेत. त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांसह आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे, अशी चर्चा बैठकीत झाली, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

१५ ते १८ वयोगट म्हणजे नववी, दहावी आणि अकरावीच्या वर्गातील मुलांचे शाळेत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांचे शाळेत लसीकरण करताना संपूर्ण काळजी घेतली जावी, अशी चर्चाही बैठकीत झाली, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

१५ ते १८ वयोगटातील ५० टक्के मुलांचे लसीकरण झालेले आहे. त्याला आता निश्चित गती मिळेल. शाळा सुरू व्हाव्यात. लहान मुलांच्या शिक्षणावर तसेच मनोविकासावर कुठल्याही प्रकारचा विपरित परिणाम होणार नाही, या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला टास्क फोर्सनेही संमती दिली आहे, असे टोपे म्हणाले.

लसीकरणाबद्दल पालकांमध्ये संभ्रम असण्याचे कोणतेही कारण नाही. जगामध्ये सगळीकडे लहान मुलांचेही लसीकरण सुरू झालेले आहे. आपल्याकडे सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलांचेच लसीकरण केले जात आहे. त्यामुळे लसीकरणाबद्दल संभ्रम बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पालकांना केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -