घरताज्या घडामोडीपंचवटी पोलीस ठाण्यात मद्यपी बाप-लेकाचा धिंगाणा

पंचवटी पोलीस ठाण्यात मद्यपी बाप-लेकाचा धिंगाणा

Subscribe

पंचवटी पोलीस ठाण्यात मद्यपी बाप-लेकांनी धिंगाणा घातल्याची घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी ७ वाजेदरम्यान घडली. पोलीस वाहनातच पोलीस कर्मचार्‍यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न करत दोघांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून दोघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम बैताडे (५२, दोघेही रा.कुमावतनगर, पंचवटी), अतुल तुकाराम बैताडे (२६) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम बैताडे आणि अतुल बैताडे हे दोघे दारु पिऊन रस्त्यावर उभे राहून शिवीगाळ करत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार पंचवटी पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोघेजण नागरिकांना शिवीगाळ करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याने ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी दोघांना पोलीस वाहनात बसवून पोलीस ठाण्याकडे निघाले. वाहनात असताना दोघांनी पोलिसांना शिवीगाळ करत एका पोलीस कर्मचार्‍याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच दोघे थांबले नाहीतर पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही दोघांनी पोलिसांना शिवीगाळ करत तब्बल अर्धा तास धिंगाणा घातला. अखेर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात आणले. रूग्णालयातही दोघांनी गोंधळ घातला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -