घरमहाराष्ट्रडेडलॉक कायम!

डेडलॉक कायम!

Subscribe

सत्तास्पर्धा दिवस 15 वा कोंडी कायम,काँगे्रसचे आमदार मुंबईत दाखल,शिवसेनेचे आमदार रंगशारदेत,पवार दौरा सोडून मुंबईत परतले,सत्ता स्थापनेचा दावा करायला कोणीही पुढे येईनात

विधानसभा निवडणूक निकालानंतर १४ दिवस झाले तरीही राज्यात सरकार स्थापनेचा डेडलॉक कायम आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी अपेक्षित आकडा मिळेत नसताना शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपण मुख्यमंत्रीपदासह ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसर्‍या बाजूला राज्यपालांना भेटायला गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाने आपण राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला नसल्याचे सांगितले आहे. राज्यातील परिस्थितीवर भाजपचे पक्ष नेतृत्त्व विचार करून योग्य तो निर्णय घेईल, असे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे. ही कोंडी कायम असताना कोकणाच्या दौर्‍यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आमच्या आमदारांना प्रलोभने दाखवत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय चलबिचल कायम असून सरकार स्थापनेसाठी मात्र कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी वांद्रे येथील रंगशारदामध्ये शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, अशी इच्छा शिवसेना आमदारांनी व्यक्त केली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आपलाच होणार, अशी ग्वाही शिवसेनेच्या आमदारांना दिली. तसेच ५०-५० च्या फॉर्म्युल्यानसारच भाजपसोबत चर्चा केली जाईल, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना मागे हटण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकंच नव्हेतर आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना रंगशारदामध्ये एकत्रित ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

एका बाजूला शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असताना भाजपही मागे हटायला तयार नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गुरुवारी राजभवनात भेट घेतली. त्यांच्यात राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचे समजते. मात्र राज्यपालांकडे भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला नाही, असे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. राज्याच्या परिस्थितीवर पक्षनेतृत्त्वच विचार करून योग्य तो निर्णय घेईल,असेही पाटील म्हणाले.

राज्यात सरकार स्थापनेची कोंडी कायम असताना शरद पवार हे आपला कोकण दौरा अर्धवट सोडून मुंबईत परत निघाले आहेत. ते मुंबईत येऊन काय खेळी करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजप आमच्या आमदारांना प्रलोभने दाखवून त्यांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवा -सरसंघचालक मोहन भागवत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील संघमुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यांच्यात राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा झाली. या भेटीत सरसंघचालकांनी जनतेच्या सेवेसाठी विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवा, असा सल्ला गडकरी यांना दिल्याचे समजते. तर फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होईल, अशी आशा गडकरी यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.

पवार इन अ‍ॅक्शन,काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज बैठक
भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असून दोन्ही पक्षांपैकी कोणीही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेची कोंडी कायम आहे. येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापनेचा अवधी असल्यामुळे आता काही तासच शिल्लक आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे सत्तेचे समीकरण जुळून येत असताना आपल्याला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश राज्यातील जनतेने दिला आहे. त्यामुळे आपण विरोधी पक्षातच बसणार असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र शेवटच्या तासाच काहीही होऊ शकते, अशी मेखही त्यांनी मारली होती. ते शेवटचे काही तास शिल्लक असताना काँग्रेस आघाडी पुन्हा एकदा सक्रिय झाली असून शुक्रवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची खलबत्ते सुरू झाली आहेत. आपल्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न भाजप करतेय, असे सांगत आघाडीने भाजपला लक्ष्य केले. दोन दिवसांपासून राज्यातील अवकाळी पाऊसग्रस्त शेतकर्‍यांच्या भेटीसाठी कोकणच्या दिशेला गेलेले पवार पुन्हा गुरूवारी रात्री मुंबईत परतलेे. मुंबईतील राजकीय घडामोडी पाहता शुक्रवारीच काँग्रेसने आमदारांची बैठक मुंबईत बोलावली आहे. राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने विरोधीपक्षही सत्तास्थापनेसाठी सज्ज झाला आहे.

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देणार असाल तरच फोन करा
ठरल्याप्रमाणे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देणार असतील तरच भाजपने फोन करावा, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचे गुरूवारी स्पष्ट केले आहे. उद्धव म्हणाले की, आपल्या पक्षाचे निर्माण स्वाभिमानातून झाले आहे. केवळ भाजपची कोंडी करायची म्हणून हे आपण सगळे करत नाही. जे ठरले आहे, त्याप्रमाणे होणार असेल तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फोन करावा. मला ठरल्यापेक्षा काहीही जास्त नको. मला खोटे ठरवायचे असेल तर हे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान फार चुकीचे आहे. भाजपला ठरवून बाजूला करायचे असे काही नाही, पण भाजप जर शब्द पाळत नसेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर करेन.अडीच वर्ष पहिली की नंतरची हा वाद नव्हता, पण जर ठरलेच नाही असे सांगत असतील तर चर्चा काय करायची, असेही उद्धव ठाकरे मातोश्रीवरील आमदारांच्या बैठकीत म्हणाले.

सरकार फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच बनेल
भाजपच्या शिष्टमंडळाने गुरुवारी दुपारी राज्यपाल कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. या भेटीनंतर पक्षनेतृत्त्व विचार करून लवकरच योग्य तो निर्णय घेईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान या भेटीला जाण्यापूर्वी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार नसून राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी त्यांची भेट घेणार आहोत, असे स्पष्ट केले होते. मात्र, सरकार महायुतीचेच बनणार असून ते देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात बनेल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -