375 व्या ‘तुकाराम बीज’साठी देहूत भाविकांची गर्दी; नियंत्रणासाठी कडक बंदोबस्त

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आज तुकाराम बीजच्या निमित्ताने देहू येथे मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झाले होते. तेव्हापासून हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत येतात. आज तुकाराम महाराजांचे 375 वी तुकाराम बीज आहे.

दरम्यान, आज या सोहळ्याची सुरुवात किर्तनाने झाली असून त्यानंतर तुकोबारायांच्या पादुकांची आरती करण्यात आली. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या महाराजांच्या वैकुंठ गमन मंदिरातमध्ये दिमाखदार पालखी काढली जाईल. या पालखीत अनेक भाविक दाखल होतात. त्यानंतर पुन्हा ही पालखी मंदिराच्या दिशेने रवाना होईल आणि दुपारी 12 पर्यंत तुकारामांच्या नामाचा आणि विठ्ठलाच्या नामाचा गजर केला जाईल. असं म्हणतात की, तुकाराम महाराजांचे ज्या स्थळावरुन वैकुंठ गमन झाले होते त्या ठिकाणी असलेला नांदुरकी वृक्ष तुकाराम बीजेला दुपारी 12:02 मिनिटांनी प्रत्यक्ष हलतो. याची अनुभूती काही वारकऱ्यांना येते.

‘तुकाराम बीज’साठी देहूत भाविकांची गर्दी

अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या तुकाराम बीजोत्सवात यंदा देखील हजारो भाविक दाखल झाले आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्ष सर्व सण-समारंभ, सोहळे उत्साहात पार पडले नव्हते त्यामुळे यंदा हा सोहळा मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी एक अप्पर पोलिस आयुक्त, एक पोलिस उपायुक्त, तीन सहायक पोलिस आयुक्त, 19 पोलिस निरीक्षक, 25 सहायक पोलिस निरीक्षक, 130 पोलिस कर्मचारी, दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दोन शीघ्र कृतिदल असा पोलिस बंदोबस्त असणार आहे. बॉम्बशोधक पथक, श्वान पथक आणि साध्या वेशात 50 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

 


हेही वाचा :

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी