घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रतिरूपतीच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वराचा विकास आराखडा; धार्मिक पर्यटनाला अधिक चालना

तिरूपतीच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वराचा विकास आराखडा; धार्मिक पर्यटनाला अधिक चालना

Subscribe

मनीष कटारिया । नाशिक

त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राचा शासनाच्या प्रसाद योजनेतून विकास सुरू आहे. त्याचप्रमाणे नव्याने स्थापन झालेल्या विश्वस्त मंडळाने भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे तसेच, त्र्यंबकेश्वरमधील धार्मिक पर्यटनवाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात तिरूपती बालाजी तसेच, शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या दोन्ही देवस्थानचे विश्वस्त त्र्यंबकेश्वरला भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यांच्या सूचनांनंतर त्र्यंबकेश्वरचा सर्वंकष विकास आराखडा तयार केला जाणार असल्याचे विश्वस्त पुरूषोत्तम कडलग यांनी सांगितले.

- Advertisement -

श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरात भाविकांची मोठी गर्दी असते. तसेच, वर्षभरही विविध पूजा-विधींसाठी देशभरातून भाविक येथे येतात. साधारणपणे दररोज सुमारे १३ हजार भाविक दर्शन घेतात. खूप गर्दी झाली तर १५ हजार भाविक दिवसभरात दर्शन घेऊ शकतात. पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे १ लाख भाविक त्र्यंबकेश्वरात आले होते. अनेकदा भाविकांना वेळेअभावी दर्शन न घेताच माघारी परतावे लागत असल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त होते. ही बाब विचारात घेऊन देशभरातील मोठ्या देवस्थानांमध्ये भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी काय सुविधा उभारलेल्या आहेत, याचा अभ्यास सुरू आहे. याबाबत विश्वस्त कैलास घुले व पुरूषोत्तम कडलग यांनी तिरूपती देवस्थानचे माजी विश्वस्त पुष्पगिरी गोविंद यांच्याशी संपर्क साधत तेथील सुविधांबाबत चर्चा केली.

तिरूपती येथील सुलभ दर्शन, गर्दीवरील नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन याबाबतही अभ्यास करण्यात आला. याच धर्तीवर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातही व्यवस्था निर्माण करण्याचा विश्वस्तांचा मानस आहे. त्यानुसार तिरूपती देवस्थानचे विश्वस्त प्रतिनिधी, तेथील आपत्ती नियंत्रण कक्षाचे अधिकारी त्र्यंबकेश्वरी भेट देऊन सध्या निर्माण करण्यात आलेल्या सुविधांचा अभ्यास करून निरीक्षण नोंदवणार आहेत. या अभ्याससानंतर काय उपायोजना करणे अपेक्षित आहे, याचा आराखडा तयार केला जाईल. तिरूपती देवस्थानसोबतच शिर्डी येथील विश्वस्त मंडळदेखील त्र्यंबकेश्वरचा अभ्यास करणार आहेत.

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांकडून तिरुपती बालाजी व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर विकासाचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य आहे. तसेच, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग येथे विकसित करण्यात आलेल्या ’महाकाल लोक’च्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरात कॉरिडोर करण्याचा आमचा मानस आहे. त्याचप्रमाणे पायाभूत सुविधांचा विकास, रोप-वेची सुविधा उभारली जाणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा, असा शासनाचा या माध्यमातून प्रयत्न आहे. गेल्या कुंभमेळ्याचा मला अनुभव आहे. त्यावेळी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची झालेल्या गैरसोयीची जाणीव असल्याने या त्रुटी दूर करण्यासाठी आपला प्रयत्न आहेे. हे राष्ट्रीय पातळीवरचे पर्यटनस्थळ असल्याने त्यादृष्टीने विकास केला जाईल. लवकरच त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा सादर केला जाईल. : गिरीश महाजन, पर्यटन मंत्री

या मुद्द्यांचा होणार अभ्यास

  • अधिकाधिक भाविकांना दर्शन कसे घेता येईल
  • वाहन पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था
  • गर्दीवरील नियंत्रणासाठी उपाययोजना
  • आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात विविध उपाययोजना करणे
  • त्र्यंबकच्या धार्मिक पर्यटनवाढीसाठी प्रयत्न
  • मंदिर परिसरातील अतिक्रमित गाळेधारकांचे पुनर्वसनाचा पर्याय
  • गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना

त्र्यंबकेश्वर देवस्थान विकासाच्या अनुषंगाने तिरूपती देवस्थानचे विश्वस्त गोविंद यांच्याशी नुकतीच चर्चा करण्यात आली. तिरूपतीच्या धर्तीवर त्र्यंबकचा एक कृतीआराखडा तयार करून देण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. यात प्रामुख्याने भाविकांसाठी दर्शन व्यवस्था, गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना, आपत्ती नियंत्रण सज्जता याविषयी मार्गदर्शन मागवले आहे. त्यानुसार त्यांचे एक पथक त्र्यंबकेश्वरला भेट देणार असून, यावर ते अभ्यास करणार आहे. देशभरातील देवस्थानांमध्ये ज्या-ज्या चांगल्या सुविधा निर्माण करण्यात आल्या असतील त्या त्र्यंबकमध्ये निर्माण उभारण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. : कैलास कडलग, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट

- Advertisement -

धार्मिक पर्यटनालाही चालना देणार

नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे तसेच, १२ वर्षांतून एकदा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्येही कुंभमेळा भरतो. त्यामुळे लाखो भाविक नाशिकमध्ये येत असतात. नाशिकमध्ये येणारा भाविक आवर्जून त्र्यंबकेश्वरला भेट देत असतो. त्यामुळे गावाचे संपूर्ण अर्थकारण हे येणार्‍या भाविक, पर्यटकांवरच अवलंबून आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिराबरोबर तालुक्यातील तीर्थस्थळांचा विकास झाल्यास धार्मिक पर्यटनाला चालना मिळू शकेल. त्र्यंबकेश्वर विश्वस्तांना घटनेनुसार काही उपाययोजना आखताना अडचणी येतात. मात्र, संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून या योजना मार्गी लावाव्यात आणि त्र्यंबक तालुक्याचा महाकालच्या धर्तीवर प्रसाद योजनेतून विकास व्हावा जेणेकरून येणार्‍या भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. यासाठी विश्वस्त मंडळ प्रयत्नशील असल्याचे कडलग यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -