घर उत्तर महाराष्ट्र ब्रह्मगिरी प्रदक्षिणा..., आनंददायी अनुभूती; हजारो भाविक रात्रीपासूनच मार्गस्थ

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा…, आनंददायी अनुभूती; हजारो भाविक रात्रीपासूनच मार्गस्थ

Subscribe

“पावे ज्याला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा जरी घडे हो
तव तव काया कष्टी चरणी रूतती खडे हो”
(अर्थ : ज्याला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घडते, त्याच्या पायाला जेवढे खडे टोचतील तेवढ्या त्याच्या पापांचा नाश होईल)

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी हजारो भावी त्र्यंबक नगरीत दाखल होत असतात. दर्शनाबरोबरच येथील ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा महत्त्वाची मानली जाते. याच पार्श्वभूमीवर भाविक दर्शनासह ब्रह्मगिरी प्रदक्षिणादेखील पूर्ण करत असतात. भाविकांची अशी श्रद्धा आहे की इथे साक्षात शिवाचे वास्तव्य आहे. आजवर अनेक महान ऋषी-मुनी, संतांनी ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या केली आहे. पुराणकालात ही प्रदक्षिणा शिक्षा म्हणुन दिली जात असे. पुराणात असेही म्हटले आहे की, ज्याने ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली त्याला संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लाभते.

- Advertisement -

श्रावण महिन्यातील चारही सोमवारी अनेक भावी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करतात. पहाटेपासूनच या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात केली जाते. कुशावर्त तीर्थात स्नान केल्यानंतर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात होते. अनेक भाविक रविवारी रात्री फेरीची सुरुवात करतात. ही फेरी साधारण 20 किलोमीटर, 40 किलोमीटरची अशा दोन मार्गाने आहे. विशेष म्हणजे ही सगळी प्रदक्षिणा अनवाणी होते.

असे आहे प्रदक्षिणेचे महत्व

श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेदरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला व भागवत धर्माची स्थापना झाल्याची आख्यायिका आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांच्या भावंडांनीही ही प्रदक्षिणा केल्याची आख्यायिका आहे. प्रदक्षिणेबाबत विश्वस्त मनोज थेटे म्हणाले की, मंदिर देवस्थानच्या पूर्वीपासून अशी परंपरा होती की त्र्यंबकेश्वर गावात ठराविक घरं नेमलेली होती. त्या घरांतील एक व्यक्ती विश्वकल्याणार्थ ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करायचे आणि त्याला त्र्यंबकेश्वर मंदिर मानधन द्यायचे. ती परंपरा कालांतराने खंडीत झाली. त्यानंतर केवळ श्रावण महिन्यापुरता ही परंपरा सुरू झाली. तिसर्‍या श्रावणी सोमवारीच प्रदक्षिणा केली पाहिजे, असे कुठेही म्हटलेले नाही. वर्षभरात कधीही प्रदक्षिणा केली तरीही भाविकांना पुण्य लाभते, असेही त्यांनी सांगितले.

पहाटेपासून प्रदक्षिणेला सुरुवात

- Advertisement -

श्रावणी सोमवारच्या आदल्या रात्री म्हणजे रविवार किंवा सोमवारी पहाटे या प्रदक्षिणेला सुरुवात केली जाते. ब्रह्मगिरी फेरीची सुरुवात त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थापासून होते. तेथून सरळ बाहेर पडल्यानंतर नाशिकच्या दिशेने भाविक चालू लागतात. त्र्यंबकेश्वर शहरापासून दोन किलोमीटरचे अंतर पार केल्यावर पेगलवाडी फाट्याजवळ उजव्या हाताला प्रयागतीर्थ नामक कुंड लागते. या कुंडाला फेरी मारुन भाविक घोटी मार्गाने पहिनेच्या दिशेने चालू लागतात. पावसाळ्यात ही फेरी होत असल्याने आजूबाजूला असलेल्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत भाविक चालतात.

..अन् पहिला टप्पा पार होतो

पहिने परिसरातून जात असताना साधारणतः तासाभराच्या अवधीनंतर उजवीकडे जाणारा रस्ता लागतो. एक रस्ता घोटीकडे तर दुसरा रस्ता खोडाळाकडे जात असतो. बाजूलाच भीलमाळ नावाचा छोटासा पाडाही लागतो. या परिसरात अनेक भाविक थोडी विश्रांती घेतात. भिलमाळ हे गाव सोडल्यानंतर काही अंतरावर धाडोशी गाव लागते. येथून काही अंतर पुढे गेल्यानंतर मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूला सिमेंटच्या रस्त्याने पुढे जावे लागते. पूर्वी हा रस्ता शेतातून जात होता. सिमेंटचा रस्ता पार करत असताना घाटसदृश चढण दिसते. हा घाट उतरत असताना या ठिकाणी गौतम ऋषींचे मंदिर असून, भाविक दर्शन घेतल्यानंतर पुढे जातात. इथे आल्यानंतर एक पहिला टप्पा पार झाल्याचे समाधान भाविकांच्या चेहर्‍यावर पाहायला मिळते.

पुढचा मार्ग खडतर

दरम्यान गौतम ऋषींचे दर्शन घेतल्यानंतरचा मार्ग खडतर होत जातो. निसरडे रस्ते, चिखल माती यामुळे डोंगर उतरताना सांभाळावे लागते. तासाभराचे अंतर पार केले की, पुढचा रस्ता आदिवासी पाड्यांमधून जातो. शेतीची कामे सुरू असल्याचे दिसते. परतीच्या रस्त्यावर डांबरी रस्ता लागल्यानंतर लहान-मोठी मंदिरेही लागतात. शेवटच्या टप्प्यात भाविक तळेगाव-सापगावजवळ पोहोचतात. हाच त्र्यंबकेश्वर-जव्हार मार्ग. येथे आल्यानंतर फेरी पूर्ण व्हायला थोडेच अंतर राहते. यावेळी मुख्य रस्त्याला लागून गौतमबारी, त्र्यंबकेश्वर शहर दिसू लागते. गौतमबारीपासून अर्धा तासाचे अंतर पार केल्यानंतर आपण त्र्यंबकेश्वरात दाखल होतो व प्रदक्षिणा पूर्ण होते.

- Advertisment -