जे कुणी मुख्यमंत्री असतील ते आपलेच

धनंजय मुंडे यांची ‘मन की बात’

Dhananjay Munde

जे कुणी मुख्यमंत्री असतील ते आपलेच असतील, असे म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.सातार्‍यातील एका कार्यक्रमात उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, पवारसाहेबांनी माझ्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली होती.

 पाच वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून मी ती जबाबदारी पार पाडली. कितीही मजबूत सरकारी पक्ष असला तरी त्याला गदागदा हलवायचे काम मी केले. आज शब्द देतोय. सामाजिक न्याय व विशेष विभागाचा मंत्री म्हणून. येणार्‍या काळात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्रिपद द्यायचे कुणाला? जे कुणी मुख्यमंत्री असतील ते आपलेच असतील. ते म्हणतील हा विभाग आपल्याशिवाय दुसर्‍या कोणाला नको. एवढी प्रतिष्ठा या विभागाला प्राप्त करून द्यायचे काम मी करेन, असा शब्द तुम्हाला देतो, असे धनंजय मुंडे म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

यात गैर काय? – सुप्रिया सुळे
धनंजय मुंडेंच्या या विधानाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, यावर वास्तवतेत जगूया. आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. महाविकास आघाडीचे सरकार अतिशय उत्तम काम करीत आहे, पण प्रत्येक पक्षाला आपला मुख्यमंत्री व्हावा हे वाटणे यात गैर काय? महाविकास आघाडी सरकार आहे. यातील तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्रिपदाच्या मागे न लागता सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही तिघे एकत्र आलो आहोत, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्या असताना पुजार्‍यांनी या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ दे, असे गार्‍हाणे घातले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळले होते.