भाजपाकडून ‘धर्मवीर’ तर, राष्ट्रवादीकडून ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

मुंबई : राज्यात केवळ महापुरुषांच्या अवमानावरून वाद होत नाही तर, त्यांना विशेषण काय द्यायचे यावरूनही वाद उफाळून येतो. छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणायचे की, धर्मवीर म्हणायचे, यावरूनही वादंग झाला होता. काल, शनिवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतीदिनी त्यावेळी भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेने त्यांना ‘धर्मवीर’ म्हटले. तर, दोन्ही काँग्रेसने ‘स्वराज्यरक्षक’ म्हटले.

हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘बाल शौर्य पुरस्कारा’च्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला. छत्रपती संभाजी महाराज यांना आपण जाणीवपूर्वक स्वराज्यरक्षक असे म्हणतो. काही जण त्यांना धर्मवीर म्हणतात. संभाजीराजे धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तरीही काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर-धर्मवीर म्हणतात, असे अजित पवार यांनी विधानसभेत म्हटले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगझेबाने संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यास सांगितले होते. पण त्यांनी मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी त्यांनी हालअपेष्टा सहन केल्या आणि बलिदान दिले. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराष्ट्राची भाषा सोडली नाही. म्हणून छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते, हे वास्तव आहे, असे फडणवीस म्हणाले. तर, लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशा पद्धतीचे अजित पवार यांचे हे वक्तव्य असल्याचे शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले होते.

छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यातही काही वावगे नाही. त्यामुळे धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक या बिरुदांबाबत तक्रार नाही. यावरून वाद नको. धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक दोन्ही उपाधी योग्यच, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोशल मीडियावर त्यांना अभिवादन करताना शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्यरक्षक’ असे संबोधले. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार नितेश राणे यांच्यासह शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी संभाजी महाराजांचा उल्लेख ‘धर्मवीर’ असाही केला आहे.

ठाकरे गट आणि मनसे राहिले लांबच
महापुरुषांच्या अवमानावरून भाजपा आणि अन्य नेत्यांवर टीकेची झोड उठविणाऱ्या ठाकरे गटाने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी या वादापासून तूर्तास तरी लांब राहण्याची भूमिका घेतल्याचे दिसते.