घरमहाराष्ट्रनाशिकशिवण क्लास केला; मग भूमिका साकारली : सायली संजीव

शिवण क्लास केला; मग भूमिका साकारली : सायली संजीव

Subscribe

‘गोष्ट एका पैठणीची’ तून पैठणीचा हृदयस्पर्शी संवाद

नाशिक : महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीचा अभिमान म्हणजे पैठणी. पैठणीचे स्वप्न प्रत्येक स्त्रीने उराशी बाळगलेले असते. कारागिरांच्या अनमोल हातांनी केलेल्या कष्टांमधून पैठणीचे रूप साकारते. प्रत्येक पैठणीची स्वतःची अशी एक गोष्ट असते आणि तिला विणणार्‍या हातांचा, प्रत्येक क्षणी तिच्याबरोबर संवाद होत असतो! हा ह्नदयस्पर्शी संवाद ऐकण्यासाठी, अनुभवण्यासाठी प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षकाने ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव आणि दिग्दर्शक शंतनू रेडे यांनी केले. यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते पुष्कर श्रोत्री हेदेखील उपस्थित होते.

प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत तसेच, शंतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपट २ डिसेंबरला प्रदर्शित झाला. ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपटाचा मान मिळवलेल्या या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू रोडे आणि अभिनेत्री सायली संजीव यांनी काल  ‘दै. आपलं महानगर’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मनमोकळा संवाद साधला.

- Advertisement -

सायली संजीव म्हणाली की, पैठणीचे माहेरघर तसे नाशिकमधील येवला. या शहरातील चित्रीकरण बघायला नाशिककरांना नक्कीच आवडेल. या चित्रपटातील आपल्या व्यक्तीरेखेला पूर्णपणे न्याय मिळावा, यासाठी मी पूरेपूर प्रयत्न केला. इंद्रायणीची भूमिका साकारण्यासाठी मी स्वतः सर्वप्रथम भूमिकेचा अभ्यास केला. कोणतीही भूमिका करताना मला त्या भूमिकेशी एकरूप व्हायला आवडते. मला असे वाटते केवळ भूमिका साकारायची म्हणून नव्हे तर ती प्रेक्षकांच्या हृदयात उतरणे, त्यांच्या मनावर बिंबवणे आवश्यक असते. म्हणूनच कोणतीही भूमिका साकारताना त्यात मन ओतून काम केले तर त्यांचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. मला एका गोष्टीचा आनंद आहे की, मी कधीच चित्रपट निवडले नाहीच. चित्रपटाने मला निवडले. प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात एकदा नक्कीच हा सिनेमा पहावा असे आवाहन सायलीने यावेळी केले.

प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत : रोडे

प्रत्येकाच्या आयुष्यात काही स्वप्नं असतात. कोणाची सत्यात उतरतात, कोणाची नाही. त्या स्वप्नांचा पाठपुरावा प्रत्येक जण आपापल्या परीने करतच असतो. आपली स्वप्नपूर्ती करतानाच्या या प्रवासात अनेक अनुभव येतात. काही चांगले असतात, काही कटू आठवणी देणारे. काही अनुभवातून आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. असाच एक रंजक प्रवास या चित्रपटातून अनुभवायला मिळत आहे. चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणे खरंच ही गोष्ट एका ‘पैठणी’ची आहे. जिच्याभोवती संपूर्ण कथा गुंफली गेली आहे. मानवी भावभावना आणि वास्तवाचा पदर असलेली ही ‘पैठणी’ त्या सर्वांचे प्रतिनिधीत्व करते. ज्या गोष्टींची माणसाला इच्छा-आकांक्षा आणि आस असते. प्रत्येकाच्या सुख, दुःखाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. ही गोष्ट इंद्रायणी (सायली संजीव) आणि सुजित (सुव्रत जोशी) या जोडप्याची आहे. त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांच्यासमोरील अडचणी आणि त्यातून बाहेर पडण्याच्या धडपडीच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. जिद्दीची आणि सचोटीची ही गोष्ट स्वकर्तृत्वावरील विश्वास वाढवणारी आहे. या गोष्टीत नेमकं काय दडलयं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

- Advertisement -

शिवण क्लास केला; मग भूमिका साकारली

या चित्रपटात मी शिवणकाम करणारी साधी गृहिणी आहे, जी आजूबाजूच्या बायकांच्या साड्यांना फॉल बिडिंग करून देणे, ब्लाऊज शिवून देणे अशी कामे करुन देते. अभिनयाच्या जोरावर ही भूमिका नक्कीच साकारता आली असती. परंतु, त्यात सहजता आणून त्या भूमिकेशी एकरूप होण्यासाठी मी दोन दिवसांचा शिवण क्लास केला. या चित्रपटात मी जुन्या काळातील मशीनवर काम करते. त्यामुळे मला शिलाई मशीन हाताळणे, सुईमध्ये दोरा भरणे या सर्व गोष्टी येणे आवश्यक होते. यासाठीच मी क्लास केला. त्यातही क्लास घेणार्‍या गृहिणीने फक्त दीडच तास शिकवेल, असे सांगितले. मी त्यालाही तयार झाले. कुठेही माझा अभिनय अनैसर्गिक वाटू नये, असे मला मनापासून वाटत होते. म्हणूनच कुणालाही कळू न देता मी हा क्लास पूर्ण केला.

प्रभावी मार्केटिंगमुळे साऊथ चित्रपट होतात हीट

मराठी सिनेमाला एक परंपरा आहे. परंतु, हेदेखील खरे आहे की, मराठी चित्रपटांना अद्यापही अपेक्षित प्रेक्षक मिळत नाही. आपल्या चित्रपटाचा कण्टेन्ट दाक्षिणात्य दिग्दर्शक घेतात. चित्रीकरण, प्रमोशन यासाठी ते मोठा खर्च करतात. त्यांचे मार्केटिंग कौशल्य अधिक प्रभावी असल्याने साऊथच्या चित्रपटांना लोकप्रियता अधिक मिळते. परंतु, अलीकडे मराठी चित्रपटांकडेही प्रेक्षक वळू लागला आहे आणि मुळात गोष्ट एका पैठणीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने ही गोष्ट अधोरेखित झाल्याचे मला वाटते, असे शंतनू रोडे यांनी सांगितले. चित्रपट अधिक रंजक बनविण्यासाठी संदर्भाची मोडतोड केली जाते हे चुकीचे आहे. असे व्हायला नको, चित्रपटाचा जो मूळ गाभा आहे त्याला हात न लावता तो जसाच्या तसा प्रेक्षकांसमोर मांडणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोष्ट एका पैठणीच्या टीम सोबतची मुलाखत पाहण्याकरीत पुढील लिंकला भेट दया..

https://www.facebook.com/watch/?v=570884091465325&aggr_v_ids[0]=570884091465325&notif_id=1670509243319333&notif_t=watch_follower_video&ref=notif

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -