घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये रंगला राजकीय नेत्यांच्या गप्पांचा फड

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगला राजकीय नेत्यांच्या गप्पांचा फड

Subscribe

दिवाळीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय नेत्यांच्या गप्पांचा फड रंगला होता. यावेळी अभिनेता भरत जाधव यांनी उपस्थिती दर्शवली होती.

राजकीय मतभेद विसरून पिंपरी-चिंचवड शहरातील दिग्गज नेते रविवार, ४ नोव्हेंबर रोजी एकत्र आले. निमित्त होते, दिशा सोशल फाउंडेशनच्या “दिवाळी फराळ” उपक्रमाचे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात जवळपास अडीच तास गप्पांची मैफिल रंगली. हास्यविनोद करताना एकमेकांची फिरकी घेण्याची संधी यावेळी कोणीच सोडली नाही. या उपक्रमात मराठी सिनेअभिनेते भरत जाधव हे देखील आवर्जून उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगतीच्या वाटचालीत महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकाच व्यासपीठावर यावे, त्यांच्यात दिलखुलास संवाद घडावा. या हेतूने दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी “दिवाळी फराळ” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांना ‘दिशा एक प्रवास’ ही माहिती पुस्तिका भेट स्वरूपात देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गोरख भालेकर यांनी केले. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. आभार कार्याध्यक्ष सचिन साठे यांनी मानले.

आकुर्डी प्राधिकरणातील केरळ भवन येथे रविवारी सकाळी पार पडलेल्या “दिवाळी फराळ” कार्यक्रमाला महापौर राहुल जाधव, माजी खासदार गजानन बाबर, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, संजय उर्फ बाळा भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, सिनेअभिनेते भरत जाधव, नाट्य निर्माते राहुल भंडारे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, पालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शिवसेनेचे मावळ जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेवक राजू मिसाळ, नाना काटे, शत्रुघ्न काटे, अमित गावडे, भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

विविध विचारांच्या पक्षांचे लोकप्रतिनिधी अशाप्रकारे एकत्र येण्याचे दुर्मिळ चित्र आज अनुभवण्यास मिळाले. सामाजिक सलोखा जपण्याचे काम यानिमित्ताने होत असते. असेच दिशादर्शक काम यापुढील काळात घडावे. पिंपरी चिंचवड शहराशी आम्हा कलावंतांचे अतूट नाते आहे. ‘गलगले निघाले’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तीन महिने शहरवासीयांनी आम्हाला प्रचंड सहकार्य केले. त्याविषयी आजही कृतज्ञता वाटते.
– भरत जाधव, अभिनेता

आपल्या शहराला सांस्कृतिक परंपरा आहे. दिवाळी फराळ ही विचारांची मेजवानी सर्वांना ऊर्जा देणारी आहे. दिशाच्या व्यासपीठावर राजकीय जोडे बाजूला ठेवून, नेहमीच्या व्यस्त कामातून वेळ काढत दिलखुलास आणि निखळ गप्पांची मैफल यानिमित्ताने जमून आली. दिशाचा हा उपक्रम अखंडितपणे सुरूच रहावा, ही अपेक्षा.
– भाऊसाहेब भोईर, अध्यक्ष, नाट्य परिषद

- Advertisement -

यावेळी महापौर राहुल जाधव म्हणाले की, आपण वेगवेगळ्या व्यासपीठावर स्वतःच्या पक्षांची ध्येयधोरणे मांडत असतोच. वेळप्रसंगी आपल्यात राजकीय जुगलबंदी, तसेच आरोप-प्रत्यारोपही होत असतात. आपापसातील मतभेद विसरून एकत्र येणे, सामाजिक बांधिलकी जपत लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद घडवण्याचे काम दिशाच्या या उपक्रमातून होत आहे. या सुसंवादाचा उपयोग शहराच्या विकासासाठी आणि विधायक वाटचालीसाठी होऊ शकतो, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -