सप्तश्रृंगी देवी मुर्तीच्या संवर्धनासाठी धर्मसभेची मान्यता आहे का ?

महंत ॠषीकेशानंद गिरी यांचा सवाल; भगवतीच्या स्वरूपात छेडछाड केल्यास आंदोलन

नाशिक : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानल्या जाणारया वणी येथील सप्तश्रृंगी देवी मंदिर विविध कामे करण्यासाठी २१ जुलैपासून ४५ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात श्री भगवती मुर्तीचे संवर्धनाबरोबरच विविध विकास कामे करण्यात येणार असल्याचे देवस्थानच्यावतीने कळविण्यात आले आहे. याच मुददयावर किन्नर आखाडयाचे महंत ॠषीकेशानंद गिरी यांनी हरकत घेतली आहे. विकासकामांच्या नावाखाली श्री भगवती मुर्तीवर वज्रलेपन करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते मात्र मुर्तीपूजा धर्मशास्त्राशी संबधित विषय आहे. विश्वस्तांना मुर्तीसह धार्मिक श्रध्देशी खेळण्याचा अधिकार नाही असे सांगत याकरीता धर्मसभेची परवानगी घेतली आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुर्तीच्या स्वरूपात छेडछाड केल्यास प्रसंगी आत्मदहनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

यासंदर्भात महंत ॠषीकेशानंद गिरी यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेत मुर्ती संवर्धनाबाबत काही प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांबाबत संस्थान खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. भारतामध्ये ५१ शक्तीपीठ आहेत यातील महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठांपैकी सप्तश्रृंगी हे एक पीठ आहे. अशा महत्वपूर्ण शक्तीपीठाला वणी देवस्थानने पुढील ४५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मंदिर बंद ठेवतांना देवस्थानने मुर्ती संवर्धन करणार असल्याचे म्हटले आहे.

मुळात विश्वस्तांना मुर्तीच्या डागडूजीचे किंवा त्यात, धार्मीक निर्णयाचे आधिकार नसल्याने वज्रालेपनाचे काम पुरातत्व विभाग, धर्मसभा यांची परवानगी देवस्थानने घेतली आहे का? वणी ग्रामस्थ, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा न करता मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय पुर्णपणे चुकीचा आहे. भारतातील प्रमुख देवस्थानांबाबत जर मुर्तीच्या स्वरूपात जर काही झीज झाली असल्यास ते पुरातत्व विभाग, स्थानिक ग्रामस्थ, साधुमहंत, शंकराचार्य यांच्याशी बोलून नंतरच निर्णय घेतला जातो. वणी देवस्थानने असे काहीही केलेले नाही. याऊलट खासगी कन्सलटंन्ट यांच्याशी जवळीक साधून ही कामे केली जाणार आहेत. त्यामुळे मंदिरात आतमध्ये जे काही करणार ते कॅमेर्‍यासमोर करण्यात यावे अशी मागणीही महंत ॠषीकेशानंद गिरी यांनी केली आहे.मुर्ती लेपनाची गरज का भासली हे स्पष्ट करावे असेही ते म्हणाले. जर श्री भगवतीच्या मुळ स्वरूपात छेडछाड केल्यास आत्मदहनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी त्र्यंबक देवस्थान ट्रस्टच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे उपस्थित होत्या.

हे मुददे केले उपस्थित

  •  मंदिर विकास कामांसाठी बंद ठेवणार की मुर्ती संवर्धनासाठी
  •  ४५ दिवस मंदिर बंद ठेवून काय करणार आहात ?
  •  खासगी संस्थांना मुर्तीला हात लावण्याचा अधिकार आहे का ?
  •  वणी सरपंच, सदस्य, ग्रामसभेला का विश्वासात घेतले नाही
  •  मुर्ती संवर्धनाची आवश्कता का भासली ?
  •  मुर्ती संवर्धनाची गरज असल्याचा अहवाल प्राप्त झालाय का ?
  •  मुर्तीशी विटंबना झाल्यास जबाबदारी निश्चित करा