ठाकरे आता ऑन फिल्ड! पक्षाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढणार

शिवसेनेला पुन्हा बळकटी येण्याकरता पक्षप्रमुख आता सक्रीय झाले आहे. ते आता महाराष्ट्र दौरा करणार असून कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन मेळावे घेणार आहेत.

uddhav thackreay

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला खिंडार पडले आहे. आमदारांनी शिवसेनेसोबत फारकत घेतल्यानंतर अनेक नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान, शिवसेनेला पुन्हा बळकटी येण्याकरता पक्षप्रमुख आता सक्रीय झाले आहे. ते आता महाराष्ट्र दौरा करणार असून कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन मेळावे घेणार आहेत. (Shivsena leader Uddhav Thackeray will visit Maharashtra soon)

पक्षाला बळकटी येण्याकरता एकीकडे आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढली असून आता उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याकरता ते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. बंडखोरी झाल्यानंतरच उद्धव ठाकरे सक्रीय झाले होते. शिवसेना भवन आणि मातोश्री येथे सतत बैठका घेत असून कार्यकर्त्यांना भेटी देत आहेत. त्यातच, येत्या दिवसांत पावसाचा अंदाज घेऊन ते महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.

शिवसेना भवनात या दौऱ्याच आखणी सुरू आहे. मुंबईतून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटून ते बैठका घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही असणार आहेत.

पक्षातील नेत्यांकडे, कार्यकर्त्यांकडे उद्धव ठाकरे लक्ष देत नाहीत, त्यांच्याशी चर्चा करत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळेच पक्षाला खिंडार लागल्याचे सांगण्यात येत होते. अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उभं करत पक्षाला एकनाथ शिंदे यांना सामील झाले आहेत. त्यामुळे आता त्यांचा महाराष्ट्र दौरा शिवसेनेला उभारी देणारा ठरेल का हे पाहावं लागेल.