खास कपडे, मेकअपमध्ये रॅम्पवर उतरले श्वान; अनोख्या स्नेहसंमेलनात २०० श्वानांचा सहभाग

नाशिक : त्र्यंबकरोडवरील ग्रेप काउंटी रिसॉर्टच्या परिसरात डॉ. दिग्विजय पाटील यांच्या पेट परफेक्ट क्लिनिकच्या संयुक्त विद्यमाने ‘पॉ-फेस्ट’ अर्थात नाशिककरांच्या पाळीव श्वानांचे अनोखे स्नेहसंमेलन पार पडले. नाशिक शहर व परिसरात मागील काही वर्षांमध्ये विविध प्रजातींच्या पाळीव श्वानांची क्रेझ वाढताना दिसत असून यामध्ये तब्बल २०० श्वानांसोबत त्यांच्या पालकांनी सक्रिय सहभाग घेतला.

 

यावेळी सहभागी श्वानांकरिता विविध स्पर्धादेखील घेण्यात आल्या. यावेळी झालेल्या फॅशन शोमध्ये चक्क श्वानांनी ‘कॅट वॉक’ करत लक्ष वेधले. दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत हा मेळा सुरू होता. या श्वान मेळ्यात नाशिककरांना वेगवेगळ्या प्रजातींचे श्वान बघावयास मिळाले. मेळ्यामध्ये सहभागी झालेल्या काही श्वान चक्क आकर्षक पोशाखातसुद्धा यावेळी दिसून आले. यावेळी पाटील यांनी उपस्थितांना श्वानांचे संगोपन करताना घ्यावयाची काळजीविषयी मार्गदर्शन केले. अशाप्रकारच्या श्वानांच्या स्नेहसंमेलन त्यांना समाजाशी जुळवून घेण्यास व मैत्रीपूर्ण स्वभावनिर्मितीसाठी पूरक ठरतात, असे पाटील म्हणाले.

श्वानांना विविध गटात बक्षिसे

सर्वोत्तम ट्यूनिंग, सर्वोत्तम नटलेले श्वान, सर्वाधिक अनुकूल श्वान, उत्कृष्ट केशरचना असलेले श्वान, सुपर हिरो पोशाखातील श्वान अशा गटांत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सहभागी झालेल्या श्वानांनी बक्षिसे पटकाविली. काही श्वानांच्या डोळ्यांवर गॉगल, तर डोक्यावर टोपी शोभून दिसली.

पोलीस श्वान गुगलची अनोखी अदा

या अनोख्या पाळीव श्वानांच्या मेळ्यात नाशिक शहर पोलिस श्वान पथकातील तरबेज श्वान गुगलनेदेखील या मेळ्यामध्ये सहभाग घेतला. यावेळी गुगलचे हॅन्डलर पोलिस कर्मचारी गणेश कोंडे यांनी गुगलचे विविध प्रात्यक्षिक दाखविले. याप्रसंगी गुन्हे शाखा युनिट १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, आयोजक तेजस चव्हाण, अपेक्षा कामत उपस्थित होते.