घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रड्राईव्हरने डोक्याला बंदुक लावून लुटले ६६ लाख; पाच दिवसापूर्वीच झाला होता रुजू

ड्राईव्हरने डोक्याला बंदुक लावून लुटले ६६ लाख; पाच दिवसापूर्वीच झाला होता रुजू

Subscribe

नाशिक : पाच दिवसांपूर्वी वाहनचालक म्हणून नोकरीस लागलेल्या युवकाने साथीदाराच्या मदतीने वृद्ध मालकास बंदुकीचा धाक दाखवून ६६ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शरणपूर रोड ते विल्होळी दरम्यान घडली. संशयितांच्या मागावर पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. याप्रकरणी कारमालक कन्हैयालाल चेतनदास मनवाणी (७२, रा. सिंधी कॉलनी, होलाराम कॉलनी, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात जबरी चोरीची तक्रार दाखल केली आहे.

वाहनचालक देविदास मोहन शिंदे (रा. सातपूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि कन्हैयालाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,मनवाणी हे हॅपी होम डेव्हलपर्समार्फत स्थावर मालमत्तांची खरेदी विक्री करतात. व्यवहारातील पैसे ते घरी नेतात. ते मंगळवारी (दि.१५) सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास कार(एमएच १५ जीएन ९५६७)मधून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्याकडे कापडी पिशवीत ६६ लाख ५० हजार रुपयांची रोकड होती. त्यावेळी कारचालक देविदास शिंदे होता.

- Advertisement -

चालकाने शरणपूर रोडवरील एका वळणावर आल्यानंतर कार अचानक थांबली. काही समजण्याच्या आत कारमध्ये एक तरुण आला. त्यानंतर कारचालक देविदासने कार सुरु करून ती पाथर्डी फाट्याच्या दिशेने नेली. पाठीमागे बसलेल्या संशयिताने पिस्तुलचा धाक दाखवून मनवाणी यांना पैशांची मागणी केली. विल्होळीलगत जैन मंदिराजवळ आल्यानंतर देविदासने कार थांबवली व कन्हैयालाल यांना कारमधून खाली उतरवून दिले. त्यानंतर दोघांनी कन्हैयालाल यांची कार व रोकड घेऊन पळ काढला. कारमधून खाली उतरल्यानंतर कन्हैयालाल यांनी घरच्यांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून कारचालक देविदास शिंदे व त्याच्या साथीदाराविरोधात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना, गुन्हे शाखेचे पथक, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रविण चव्हाण आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -