पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना ईडीचे समन्स, उद्या हजर राहावे लागणार

संचालनालयाने संजय राऊत यांचा अलिबागमधील भूखंड आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला होता. ईडीने राऊतशिवाय त्यांच्या पत्नीचीही चौकशी केली आहे.

मुंबईः महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगात शिवसेना नेते संजय राऊत यांना मोठा झटका बसला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले असून, उद्या हजर राहण्यास सांगितले आहे.

पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संजय राऊत यांना उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने शिवसेना नेत्यांची 1,034 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. अंमलबजावणी संचालनालयाने संजय राऊत यांचा अलिबागमधील भूखंड आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला होता. ईडीने राऊतशिवाय त्यांच्या पत्नीचीही चौकशी केली होती.


ईडीने मालमत्ता जप्त केली

यापूर्वी ईडीकडून या प्रकरणात आतापर्यंत 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यातील 9 कोटींची मालमत्ता प्रवीण राऊत यांची आहे, तर 2 कोटींची मालमत्ता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या मालकीची आहे. ईडीच्या कारवाईवर संजय राऊत म्हणाले की, त्यांची संपत्ती जप्त झाली किंवा गोळ्या झाडल्या तरी या प्रकरणाला मी घाबरत नाही. राऊत यांनी ईडीची ही कारवाई सुडाची कारवाई असल्याचे म्हटले होते.

दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्यांनीही संजय राऊतांवर निशाणा साधलाय. संजय राऊत साहेब, तुम्ही मला, माझ्या पत्नीला, माझा मुलगा नीलला, आईला जेलमध्ये टाकायचे प्रयत्न करा…. धमक्या द्या, हल्ले करा शिव्या द्या…. परंतु “हिसाब तो देना पडेगा “, असं म्हणत किरीट सोमय्यांनी संजय राऊतांना इशारा दिलाय.

काय आहे पत्रा चाळ जमीन घोटाळा?

मुंबईतील गोरेगाव इथे पत्रा चाळ आहे. महाराष्ट्र सरकारने चाळींमध्ये राहणाऱ्या ६७२ भाडेकरूंना फ्लॅट देण्याची सरकारी योजना आखली, तेव्हा हा घोटाळा सुरू झाला आणि एचडीआयएलची कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने भाडेकरूंसाठी सदनिका बांधण्याचे कंत्राट दिले. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना ६७२ सदनिका देऊन ३ हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. चाळीतील ४७ एकर जागेवर हे फ्लॅट्स बांधले जाणार होते, पण गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅट्स दिले नाहीत. कंपनीने ४७ एकर जमीन इतर आठ बिल्डर्सना १,०३४ कोटी रुपयांना विकली. या जमीन घोटाळ्यात एचडीआयएल कंपनीने केलेल्या घोटाळ्यांमध्ये प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवान यांचा समावेश आहे. प्रवीण राऊत हा संजय राऊतांचा मित्र असून, ईडीच्या तपासात त्याचे नाव पुढे आले आहे.

संजय राऊत यांच्या पत्नीचाही जमीन घोटाळ्यात सहभाग

प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते, ज्याचा वापर संजय राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. या जमीन घोटाळ्यातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचे नावही संजय राऊत यांच्याशी जोडले गेले होते. सुजित हा संजय राऊतांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही पत्रा चाळ जमीन घोटाळ्याच्या पैशातून खरेदी करण्यात आली होती.


हेही वाचाः 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचा याचिकेत दावा