नाशिक शहरात पोलिसांचा रूट मार्च

पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

नाशिक : शिवसेनेतील बंडखोर आमदार परराज्यात असले तरी, त्यांच्या कार्यालय आणि निवासाबाहेर संतप्त शिवसैनिकांकडून आंदोलने होण्याची शक्यता असून, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी नाशिक शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांकडून रविवारी (दि.२६) सायंकाळी ५ ते ६ वाजता कॅनडा कॉर्नर, सीबीएस ते भद्रकालीत रूट मार्च काढण्यात आला.

राज्यात बंडखोर आमदारांमुळे राजकारण ढवळून निघाले असून, शिवसैनिक आक्रमक झाले आहे. नाशिक शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी नाशिक शहर पोलिसांनी रूट मार्च काढला. या रूट मार्चमध्ये पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, सरकारवाडा व भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

असा होता मार्ग

आमदार सुहास कांदे यांचे कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय, कुलकर्णी गार्डन, राजीव गांधी भवन, टिळकवाडी सिग्नल, स्नेहबंधन, नाशिक तालुका पोलीस ठाणे, सीबीएस सिग्नल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नेपाळी कॉर्नर, दूधबाजारमार्गे भद्रकाली पोलीस ठाणे.

असा होता बंदोबस्त

रूट मार्चमध्ये सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे, सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह सात सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ९० पोलीस अंमदार, ८ वाहने आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या सहभागी झाल्या होत्या.