मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राष्ट्रवादीतील नाथांचे स्वप्न भंगले

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे महाविकास आघाडीतील बऱ्याच नेतेमंडळींना मोठा धक्का बसला आहे. मुख्यत्वे भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर विधानपरिषदेत बाजी मारत आमदार झालेले एकनाथ खडसे यांना चांगलाच दणका बसला आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर नाथाभाऊंचा मंत्रिपदाचा पुन्हा एकदा भंग झाला आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. तर दुसरीकडे नाथाभाऊंचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले आहे. खडसेंना बऱ्याच कालावधीपासून राजकीय ग्रहण लागले होते. तसेच राष्ट्रवादीने त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्याच्या यादीत समाविष्ट केले होते, मात्र राज्यपालांनी दीड वर्षापासून त्यावर निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे त्यांना आमदार होता आले नाही. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेची उमेदवारी देत आमदार म्हणून निवडून आणले.

खडसे विधानपरिषदेत आमदार झाल्यानंतर ते मंत्री होतील अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. परंतु सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे मंत्री होऊ शकणार नाही, अशी राजकीय परिस्थिती असली तरी विधानपरिषदेत नाथाभाऊ राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, एका बाजूकडून एकनाथ खडसेंचा लालदिवा गेला असला तरी दुसऱ्या बाजूने त्यांना विरोधी पक्षनेता हे महत्त्वाचे पद मिळू शकते.


हेही वाचा : शिंदेंना सेनेनं पक्षनेतेपदावरून हटवल्यानंतर समर्थक आमदार आक्रमक, केसरकर म्हणाले… उत्तर देणार