घरमहाराष्ट्रकसं काय पाटील बरं हाय ना, काल दिल्लीत काय झालं ते खरं...

कसं काय पाटील बरं हाय ना, काल दिल्लीत काय झालं ते खरं हाय ना? मुख्यमंत्र्यांचा जयंत पाटलांना टोला

Subscribe

पैठण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर चर्चा केली होती. सत्तासंघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांनी उदय लळीत यांची भेट घेणं उचित नव्हतं असं राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. यावरून एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे. कसं काय पाटील बरं आहे का काल दिल्लीत झालं ते खरं आहे का? असा जुन्या चित्रपटातील एका गाण्याचा संदर्भ घेत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीत झालेल्या घटनेचा दाखला देत जयंत पाटील यांना डिवचलं आहे. पैठणमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत हजारोंची गर्दी जमा झाली. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी जयंत पटलांवर टीकास्त्र सोडलं.

कसं काय पाटील बरं आहे का काल दिल्लीत झालं ते खरं आहे का? दिल्लीत काय झालं. जयंतरावांनी अजितदादांना बोलून दिलं नाही. दादा रागाने निघून गेले. पण जयंतरावांना कसला राग आहे माहितेय? जयंतरावांना विरोधीपक्ष नेता व्हायचं होतं. पण दादांनी होऊ दिलं नाही. असो त्यांच्या अंतर्गत राजकारणात मला पडायचं नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांची पैठणमध्ये विराट सभा, विरोधकांवर टोलेबाजी आणि आश्वासनांची खैरात

उदय लळीत यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने कार्यक्रम आयोजित केला होता. मी आणि उपमुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित होतो. उच्च न्यायालयाच्या या कार्यक्रमात आम्हाला निमंत्रित केलं होतं. महाराष्ट्राचा सुपूत्र देशाच्या सर्वोच्च पदावर बसतो तेव्हा आपल्याला अभिमान असतो. आम्हाला निमंत्रण दिलं होतं. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब होती, म्हणून आम्ही तिथे गेलो होतो, असं एकनाथ शिंदेंनी पुढे स्पष्ट केलं.

- Advertisement -

आधी दादा आता ताई टीका करतायत

आधी दादा टीका करत होते, आता ताईपण सुरू झाल्यात. ते त्यांचं काम करतात. कोणी वंदा, कोणी निंदा टीका करणे हा विरोधकांचा धंदा, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे, एक कार्यक्रमात जाण्यासाठी आणि दुसरा मंत्रालयात बसण्यासाठी असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या या टीकेवर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

माझ्यातील कार्यकर्ता मरू देणार नाही

मला नागरिकांसोबत अंतर राखायचं नाही. म्हणून मी सर्वांच्या गाठीभेटी घेत असतो. मुख्मयंत्री आपल्यातचलाच आहे. हा सर्वसामान्यातला मुख्यमंत्री आहे, असं नागरिकांना वाटतं. मुख्यमंत्री घरच्या गाठीभेटी घेतात, अशी माझ्यावर टीका होते. पण ती माझी माणसं आहेत, ते प्रेमाने बोलवतात. मी नेहमीच सर्वांच्या घरी जात असतो. कालपर्यंत हा बाबा येत होता, आता हा बाबा बदलला, असं व्हायला नको म्हणून मी आजही सर्वांच्या घरी जातो. माझ्यात कधीच बदल होणार आहे. मी मुख्यमंत्री असलो तरीही मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी माझ्यातील कार्यकर्ता मरू देणार नाही.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -