ठाकरे गटाला पुन्हा धक्का, निवडणूक आयोगाकडून १५ दिवसांचीच मुदत

uddhav thackeray

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सध्या संघर्ष सुरू आहे. हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला असून निवडणूक आयोगाकडे याबाबत १९ जुलै २०२२ रोजी पत्र लिहिले आहे. याबाबत शिवसेनेला आता येत्या १५ दिवसांत पक्षाबाबत कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करायची आहेत. शिवसेनेने चार आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र,निवडणूक आयोगाने त्यांना केवळ १५ दिवसांची मुदत देऊ केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील निर्णय येत नाही तोवर निवडणूक आयोगाकडून कोणतीही कारवाई करण्यात येणार नाहीय. दरम्यान, १२ ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी आता २२ ऑगस्टला ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाचा पेचावर २२ ऑगस्टलाच सुनावणी होणार आहे. या सुनावणीत हे प्रकरण खंडपीठाकडे वर्ग करायचं की नाही यावरही सुनावणी होणार आहे.

हेही वाचा – कागदपत्रं सादरीकरणासाठी चार आठवड्यांची मुदत द्या, निवडणूक आयोगाकडून शिवसेनेची मागणी मान्य

एकनाथ शिंदे यांनी बंड करून सेनेतील ४० आमदारांना आपल्या बाजूने वळवून घेतले. तसेच, १२ खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाने आता आपण मूळ शिवसेना पक्ष आहोत असा दावा केला आहे. दरम्यान, या दाव्याला कायदेशीर मान्यता मिळण्याकरता त्यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत याचिका दाखल केली. तसेच, शिवसेनेच्या ठाकरेंनीही सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रेबाबत याचिका दाखल केली. ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेल्याने शिंदे गटानेही सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली. दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या याचिकांवर एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! 19 जिल्ह्यांत 19 मंत्र्यांना झेंडावंदनाचे अधिकार बहाल

तसेच, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करू नये अशीही याचिका उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेत ठाकरे गटाची मागणी मान्य करण्यात आली. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर निवडणूक आयोग पक्षाबाबत कोणताच निर्णय घेऊ शकणार नाही.

शिवसेनेला लोकसभा, विधानसभा आणि शिवसेनेच्या राजकीय पक्ष रचनेत कोणाकडे बहुमत आहे हे सिद्ध करावं लागणार आहे. याकरता ठाकरेंना पक्षाबाबत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.