अहिराणी गायकीच्या क्षेत्रातही सावित्रीच्या लेकींचा डंका

सावित्रीबाई फुले जयंती विशेष

 नाशिक :  काही महिन्यांपासून आपल्या ठसकेबाज आवाजाने रसिकांना भुरळ घालणारी झुमकावली पोर उर्फ राणी कुमावत.. खान्देशी गाण्यांची राणी म्हणून प्रसिद्ध मेघा मुसळ आणि नवरात्रीत ‘संबळ वाजी र्‍हायना माय’ गाण्याने भक्तांना मंत्रमुग्ध करणारी गायत्री मेतकर.. या तिघींनी अत्यंत बिकट परिस्थितीतून पुढे येत स्वतःला सिद्ध केले. अशा या सावित्रीच्या लेकींनी अहिराणी गायकीच्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

राणीचे वडील रिक्षाचालक तर, मेघाच्या वडीलांना ती लहान असतानाच शारीरिक व्याधी पडली आणि कमी वयात तिच्यावर घरची जबाबदारी आली. अंजना ही सॉफ्टवेअर इंजिनीअर. मात्र, आपल्या कलेच्या बळावर तिने अवघ्या महाराष्ट्राला आपल्या आवाजाने जिंकून घेतले. तर, गायत्रीचे वडील वर्तमानपत्र टाकण्याचे काम करतात. नुकतेच तिने गायन क्षेत्रात विशारद ही पदवी पूर्ण केली आहे. या सर्व महिला सामान्य कुटुंबातून आल्या आहेत.

घरचा कुठलाही आर्थिक पाठिंबा नसताना या लेकींनी स्वबळावर आपले विश्व निर्माण केले. बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणेच दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढते आहे. कोणताही वारसा नसताना या मुलींनी प्रचंड कष्ट करत, बर्‍यावाईट प्रसंगांना तोंड देत जिद्दीच्या बळावर हे यश गाठले. आपलं महानगरशी बोलताना या सावित्रीच्या लेकींनी आगामी काळात आणखी जोमाने प्रयत्न करून गाण्यांची निर्मिती करणार असल्याचे सांगितले.

वडील रिक्षा चालवतात आणि आई कपडे शिवते. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला एवढे यश मिळेल. घरच्यांचा माझ्या या क्षेत्रात काम करण्याच्या निर्णयाला सुरुवातीला पाठिंबा नव्हता. परंतु, आता गाण हीट झाल्यावर पाठिंबा मिळतोय.
– राणी कुमावत, अभिनेत्री, झुमकावाली पोर.

माझ मूळ गाव विदर्भातील. अहिराणी भाषेचा आणि माझा संबंध नसताना मला अहिराणी गाण्यांची गोडी लागली. घरची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. माझ्या वडिलांची तब्बेत चांगली नसायची. पाचवीत असताना मी गायला सुरुवात केली. आज माझ्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे मी स्वत: पेलली आहे. आगामी वर्षात अनेक अहिराणी गाणी मी आपल्या भेटीला घेवून येणार आहे. – मेघा मुसळे, गायिका, कर मन्हं लगन

लहानपणापासूनच मला गायनाचा छंद होता. परंतु, घरच्यांचा फारसा पाठिंबा नव्हता. घरच्यांमुळे सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतरही माझा छंद मला शांत बसू देत नव्हता. माझे गाणे हीट व्हायला लागले तेव्हा घरच्यांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे मला अधिक बळ मिळाले. या वर्षात आणखी दमदार गाणी येतील.– अंजना बर्लेकर, गायिका, देख तुनी बायको कशी नाची र्‍हाईनी

माझ्या वडिलांचा पेपरचा व्यवसाय होता. मी सामान्य कुटुंबात वाढली आहे. देवीच्या कृपेने माझे पहिले गाणे रिलिज झाले. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्या गाण्याला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतील. लहानपणापासूनच मला संगीताची आवड होती. माझ्या घरच्यांचा पाठिंबा असल्यामुळे मी यावर्षी गायन विशारद ही पदवी पूर्ण केली आहे. आता मी माझ्या नवनवीन गाण्यांसाठी आणखी कष्ट घेऊन रसिकांसमोर घेऊन येणार आहे. – गायत्री मेतकर, गायिका, संबळ वाजी र्‍हायना माय