१८ वर्षांनी परतला प्रियकर, केला तिच्यावर बलात्कार

पूर्व प्रियकराशी फेसबुकवरुन नव्याने झालेली ओळख इतकी महागात पडेल याची पुसटशी कल्पनाही पीडित महिलेला नसावी...

Girl Pregnant
प्रातिनिधिक फोटो
पूर्व प्रेयसीच्या आयुष्यात १८ वर्षांनंतर परतलेल्या प्रियकराने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथे घडली आहे. इतकंच नाही तर बलात्काराची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत, या नराधमाने पीडितेकडे एक लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून प्रेयसीने याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. विश्वनाथ वाल्हे असं या माथेफिरू प्रियकराचं नाव असून सध्या तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, चिंचवड पोलीस विश्वनाथचा शोध घेत आहेत. आरोपी विश्वनाथ वाल्हे आणि पीडिता हे दोघं नुकतेच फेसबुकवरुन पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले होते. मात्र, पूर्व प्रियकराशी नव्याने झालेली ओळख इतकी महागात पडेल याची पुसटशी कल्पनाही पीडितेला नसावी.

वाचा : मुन्नाभाई M.B.B.S चा हिरो ३ वर्षांपासून गायब

३८ वर्षीय पीडित महिलेचे लग्नापूर्वी विश्वनाथशी प्रेम संबंध होते. परंतु लग्न झालं आणि ती उल्हासनगर ठाणे येथे राहायला गेली. त्यानंतर जवळपास १८ वर्ष दोघांमध्ये काहीच संपर्क नव्हता. मात्र, काही महिन्यांपूर्वी दोघे फेसबुकवरून संपर्कात आले. दोघांनी एकमेकांचा नंबर घेऊन पुन्हा भेटण्यास सुरुवात केली. एक दिवस विश्वनाथ पीडितेला घेऊन चिंचवड येथे आला. त्यानंतर त्याने तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचं त्याने व्हिडिओ शूटिंगही केलं आणि ”एक लाख रुपये दे नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करेन” अशी धमकी पीडितेला दिली. तसंच पीडितेचे त्या अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ तिच्या भावाला आणि नवऱ्याला दाखवयाची धमकीही विश्वनाथने दिली. मात्र, कशीबशी ही महिली अखेर तिथून निसटली आणि तिने थेट चिंचवड पोलिस स्टेशनात धाव घेत घेतली. पोलिसांनी पीडितेची लेखी तक्रार नोंदवून घेतली असून, ते फरार विश्वनाथचा शोध घेत आहेत.