परमबीर सिंह ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल; आणखी एका खंडणीच्या आरोपप्रकरणी होणार चौकशी

parambir singh

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह शुक्रवारी ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्यावर क्रिकेट बुकी सोनू जालान याने खंडणीचे आरोप करत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी परमबीर सिंह ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे परमबीर सिंग यांची चौकशी करणार असून ते देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले.

क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर हे आरोप केले आहेत. २०१८ साली परमबीर सिंग यांनी मकोका लावून माझ्याकडून ३ कोटी ४५ लाख रुपये वसूल केल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात परमबीर सिंह यांना ठाणे नगर पोलिसांनी समन्स जारी केले होते. ठाणे नगर पोलिसांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती.

परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेकडून ८ तास चौकशी

राज्याच्या गृहरक्षक दलाचे महासंचालक तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे तब्बल २३१ दिवसांनंतर गुरुवारी मुंबईत दाखल आहे. मुंबईत दाखल होताच सिंह मुंबई गुन्हे शाखा, कक्ष ११च्या कांदिवली येथील कार्यालयात चौकशीसाठी दुपारी १२ वाजता हजर झाले होते. गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्यात परमबीर सिंह हे आरोपी आहेत. गुन्हे शाखेकडून तब्बल साडेसहा तास त्यांची चौकशी करण्यात अली असून त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सायंकाळी साडेसहा वाजता चौकशी पूर्ण झाल्यावर परमबीर सिंह गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले.

गुरुवारी सकाळी ११ वाजता परमबीर सिंह मुंबईत आले. त्यानंतर ते थेट मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११ च्या कार्यालयात दाखल झाले. गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त निलोत्पल आणि कक्ष ११ चे प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी परमबीर सिंह यांची तब्बल साडेसहा तास चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला. संध्याकाळी साडेसहा वाजता सिंह हे गुन्हे शाखा कक्ष ११ च्या कार्यालयातून बाहेर पडले. परंतु पत्रकारांना टाळत ते थेट दुसऱ्या गेटमधून बाहेर पडत खासगी वाहनातून दक्षिण मुंबईच्या दिशेने रवाना झाले. परमवीर यांच्या वकिलांनी पत्रकारांना सांगितले की, या गुन्ह्यात परमबीर सिंह यांच्याकडून तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्यात आले.