घरमहाराष्ट्रमुसळधार पावसामुळे कोकण ठप्प!

मुसळधार पावसामुळे कोकण ठप्प!

Subscribe

महाड, महाड, चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर पाण्याखाली, दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेली

रत्नागिरी, रायगडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने महाड, चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूरमध्ये महापूर आल्याने हाहा:कार उडाला आहे. महामार्ग व कोकण रेल्वे बंद पडल्याने कोकण ठप्प झाले आहे. महाड, चिपळूण पाण्याखाली गेले असताना हजारो लोक आपल्या घरात अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी पुणेवरून चिपळूणकडे जाणार्‍या एनडीआरएफच्या टीम कोयनेत अडकल्या आहेत. नवजा मार्गावर दरड आणि झाड पडल्याने टीम अडकून पडली आहे. राज्य शासनाने बचावासाठी दोन हॅलिकॉप्टरची व्यवस्था केली होती.

मात्र, रात्री उशिरापर्यंत ही हॅलिकॉप्टर्स पोहचली नव्हती. चिपळूण शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एक महिला पाण्यात बुडाली असुन दुसरी वाहून गेली असे सांगण्यात येते. एकविरा मंदिर भागात राहणार्‍या एका कुटुंबाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना वृध्द महिलेचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. तर, रत्नागिरी जवळील टेंबे बौध्द वाडी येथे निघालेली आशा प्रदिप पवार या महिलेचा पर्‍याच्या पाण्यात वाहून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सात वाजता घडली आहे. सदर महिला कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात जात होत्या. मात्र, यावेळी पर्‍याला पुराचे पाणी आल्याने पर्‍या ओलांडताना ही घटना घडली आहे.

- Advertisement -

चिपळूणमध्ये पुराची भीषण परिस्थिती ओढवली असून संपूर्ण चिपळूण शहर खेर्डी, कळंबस्ते, परिसर पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून वशिष्टी व शीवनदीला आलेल्या पुरामुळे चिपळूण जलमय झाले आहे. अंतर्गत रस्त्यांवर तब्बल आठ फुट पाणी भरलेले असल्याने बंद झालेले आहेत. बाजारापेठा व शेकडो घरांमध्ये पाणी शिरले आहे. मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक सुध्दा ठप्प झाली आहे.

रस्त्यावरील बहाद्दुर शेख पूल वहातुकीसाठी बंद झाला आहे. अनेक घरांच्या छप्परांपर्यंत पाणी आल्याने शेकडो घरांची परस्थिती बिकट बनली आहे. हजारो लोक मदतीच्या प्रतीक्षेत असून अजूनही त्यांच्यापर्यंत मदत यंत्रणा पोहोचलेली नाही. शहरातील जुना बाजारपूल,बाजारपेठ, जुने बसस्टॅड, चिंचनाका, मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपूर रोड,एसटी स्टँड, भोगाळे व परशुराम नगर जलमय झाले असुन घरे पाण्याखाली गेली आहेत. साप व मगरींच्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संगमेश्वर बाजारपेठेत, आठवडा बाजार, राम पेठ रोड, गणपती मंदिराजवळ, गदेवखार, भीडे वखार आदी भागात शास्त्री नदीमुळे पुरस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या घरातून नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

- Advertisement -

अतिवृष्टी, भरती आणि कोयनेचे पाणी सोडल्यामुळे वशिष्टी नदीला पूर आला, असे आता चिपळूणकरांचे म्हणणे आहे. वशिष्ठी नदीवरील रेल्वेच्या पुलाला पाणी लागले होते. पुराचा धोका लक्षात येताच कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे विविध स्थानकांवर रेल्वे थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.

६ हजार प्रवासी अडकले
रायगड,रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे मुंबई-गोवा महामार्ग बंद झाला आहे तर दुसरीकडे कोकण रेल्वेही ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील विविध स्टेशन्सवर सुमारे ६ हजार प्रवासी अडकले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतरच कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत होणार असून तोपर्यंत या प्रवाशांची रखडपट्टी होणार आहे. याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

यंत्रणांनी सतर्क राहून बचावकार्य करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा दिला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांनी सतर्क राहून बचावकार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले. पावसामुळे कोकणातील नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणार्‍या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

गेल्या २४ तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी तातडीची बैठक घेतली. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एनडीआरएफच्या तुकड्या, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत असल्याची माहिती दिली.

महाड, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर, संगमेश्वर पाण्याखाली
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून सध्या ती ९ मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी ७ मीटर असून ती ७.८ मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या १.७४ मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरांसह परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलविणे, स्थलांतर करणे आणि इतर मदतकार्य जोरात सुरू केले आहे. रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदी धोका पातळी वरून वाहत असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी , उल्हास या नद्याही इशारा पातळीवर वाहायला सुरुवात झाली आहे. महाबळेश्वर परिसरात गेल्या २४ तासांत ४८० मिमी पाऊस झाल्याने सावित्री आणि इतर नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पातही जोरदार पाऊस झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

तीस घरे दरडीखाली
महाडमधील तळीये गावात दरड कोसळल्यामुळे तीस घरे दरडीखाली सापडली असल्याची माहिती रात्री उशीरा हाती आली. येथे बचावकार्य त्वरीत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -