घरमहाराष्ट्रसनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांवर फडणवीसांचा प्रभाव

सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांवर फडणवीसांचा प्रभाव

Subscribe

मागील 6 दिवसात 35 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

राज्य सरकारने मागील 6 दिवसात प्रशासनातील ३५ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांवर आणि नियुक्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. २०१४ ते २०१९ या 5 वर्षात मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या फडणवीस यांना सनदी अधिकार्‍यांच्या कार्यक्षमतेची पुरेपूर माहिती आहे. त्यामुळे सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या फडणवीस यांच्या कलानेच झाल्याची चर्चा आहे.

सामान्य प्रशासन विभागाने २ जून रोजी २० अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात ठाकरे सरकारच्या काळात पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या संजीव जयस्वाल यांची म्हाडाच्या उपाध्यक्षपदी बदली करण्यात आली. फडणवीस मुख्यमंत्री असताना जयस्वाल हे ठाणे महापालिकेचे आयुक्त होते. जयस्वाल हे फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे गृहनिर्माण खाते सांभाळणार्‍या उपमुख्यमंत्र्यांनी जयस्वाल यांना म्हाडात संधी दिल्याचे बोलले जाते.

- Advertisement -

म्हाडातून सिडकोत बदली झालेले अनिल डिग्गीकर हेही भाजपशी जवळीक असलेले अधिकारी आहेत. जेएनपीटीतून बदली झाल्यानंतर डिग्गीकर यांच्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष पद निर्माण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची पर्यावरण विभागात नेमणूक झाली होती. २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर डिग्गीकर यांची म्हाडात वर्णी लागली होती. आता फडणवीस यांनी त्यांना म्हाडातून सिडकोत नेले आहे. मनीषा पाटणकर-म्हैसकर याही फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांना यावेळी गृह किंवा महसूल विभागाची अपेक्षा होती, मात्र त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून संधी देण्यात आली. सध्या मंत्रिमंडळात हे खाते भाजपकडे आहे. भारतीय महसूल सेवेतील अधिकारी असलेले सुधाकर शिंदे यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून वर्णी लागली आहे. सुधाकर शिंदे हे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचे बंधू आहेत. २०१४ साली भाजपचे सरकार आल्यानंतर सुधाकर शिंदे हे राज्यात प्रतिनियुक्तीवर आले होते. त्यांनी यापूर्वी पनवेल महापालिका आयुक्त म्हणून काम केले आहे.

मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी गगराणी, करीर यांच्या नावाची चर्चा

- Advertisement -

दरम्यान, मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून आय. एस. चहल यांना गेल्या महिन्यात 3 वर्षे पूर्ण झाल्याने महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून भूषण गगराणी आणि डॉ. नितीन करीर या दोन ज्येष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या नावाची चर्चा आहे. यापैकी गगराणी हे सध्या मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत, तर डॉ. करीर यांची अलीकडेच वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. डॉ. करीर हे पुढील वर्षी मार्च महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीपूर्वी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या मुंबई महापालिका आयुक्तपदी काम करण्याची संधी मिळावी, अशी त्यांची मनीषा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चहल यांची बदली झाल्यास त्यांच्या जागी कुणाला संधी मिळेल याकडे आयएएस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -