मेट्रो कारशेड आरेमध्येच, फडणवीसांनी केले स्पष्ट

who will perform ashadhi maha puja fadnavis or thackeray discussion on social media

मुंबई : माझा राग मुंबईवर काढू नका, कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा प्रस्ताव बदलू नका, अशी आग्रहाची विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला केली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईकरांचे हित आरेमध्येच कारशेड उभारण्यात आहे, असे स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. माझ्यावर राग आहे ना तो माझ्यावर काढा. पण मुंबईच्या काळजात कट्यार घसवू नका. माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका, कांजुरमार्गचा जो प्रस्ताव दिला आहे त्यात कुठेही अहंकार नाही. मी मुंबईकरांच्या वतीने हात जोडून विनंती करतो, आरेचा जो काही आपला आग्रह आहे तो रेटू नका. जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहोचेल. अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत केली.

आता तुम्ही आरेचा भाग घेतल्यानंतर कालांतराने तिथे रहदारी सुरू होईल आणि आजूबाजूच्या परिसरातील वनजीवन हे धोक्यात येईल. पण जवळपास 800 एकर मुंबईतील जंगल आम्ही राखीव करून टाकले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

कुलाबा- वांद्रे – सीप्झ या मेट्रो 3 प्रकल्पासाठी आरे कॉलनीत कारशेड उभारण्यात येणार होती. पण झालेल्या विरोधानंतर हा मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग परिसरात हलवण्याचा निर्णय मागील महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. राज्य सरकारने कांजूरमार्ग येथील जमीन हस्तारित केल्यानंतर केद्रांच्या मीठागर आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत कांजूरमार्गची जमीन केंद्र सरकारच्या मालकीची असल्याचा दावा केला. त्यावरून कारशेडच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिली होती.

त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही पूर्ण विचार करून योग्य निर्णय घेऊ. उद्धव ठाकरे यांच्या विनंतीचा आदर आहे. पण कारशेडच्या संदर्भात मुंबईकरांचे हित हेच आहे की, जिथे कारशेड 25 टक्के तयार झाले आहे, तिथेच ते १०० टक्के तयार व्हावे. सर्वोच्च न्यायालयाची देखील त्याला मान्यता आहे, असे फडणवीस यांनी दिले.