घरताज्या घडामोडीही आहे मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांची रुपरेषा, रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

ही आहे मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांची रुपरेषा, रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

Subscribe

संमेलन कार्यक्रमपत्रिकेला अखेर सापडला मुहूर्त, विविध मान्यवरांची उपस्थिती

नाशिक – शहरात होणार्‍या ९४ व्या साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका गुरुवारी (दि.२५) अखेर जाहीर झाली. त्यानुसार संमेलनात परिसंवाद, कवीकट्ट्यासह विविध भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी साहित्यिक, लेखक, कवींसह रसिकांना मिळणार आहे. ३ डिसेंबरला दुपारी ४.३० वाजता संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर, मावळते संमेलन अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रमुख पाहुणे गीतकार जावेद अख्तर आणि उद्घाटक साहित्यिक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचा समारोप ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पहिला दिवस (शुक्रवार, दि. ३ डिसेंबर)

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिळकवाडी येथून सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. तेथून साहित्यिक व रसिक निमाणी बस स्टँडपर्यंत पायी येणार आहेत. त्यानंतर सर्वजण वाहनांनी कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव, नाशिकच्या प्रवेशद्वारापर्यंत येतील. परत दिंडी पायी संमेलनस्थळापर्यंत जाईल. संमेलनस्थळी सकाळी ११ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. सकाळी ११ वाजता फार्मसी बिल्डिंगमध्ये कलाप्रदर्शनाचे उद्घाटन विजयराज बोधनकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. सकाळी ११.३० वाजता ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते होणार आहे. त्याचवेळी नाशिक लेखक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. गो. तु. पाटील यांच्या हस्ते केले जाणार आहे. दुपारी १२ वाजता मध्यवर्ती हिरवळीवर अभिजात मराठी दालनाचे उद्घाटन सुभाष देसाई यांच्या हस्ते केले जाणार आहे. दुपारी ४ वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. प्रथा व परंपरेनुसार स्वागताध्यक्षांचे भाषण, ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षांचा आणि उपस्थित संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा सत्कार, ९३ व्या संमेलनाच्या अध्यक्षांचे मनोगत आणि नवीन अध्यक्षांकडे अध्यक्षीय सूत्र प्रदान कार्यक्रम, उद्घाटकांचे भाषण, संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण होईल. सुरुवातीला स्वागत गीत, संमेलन गीत आणि अखेरीस आभार प्रदर्शन असेल. रात्री ९ वाजता निमंत्रित कवींचे कविसंमेलन होईल.

- Advertisement -

दुसरा दिवस (शनिवार, दि. ४ डिसेंबर)

सकाळी १० वाजता प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील आणि राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर घेणार आहेत. खजूर गार्डन येथे सकाळी ११ वाजता बालकुमार साहित्य मेळावा होणार असून, उद्घाटन अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते केले जाईल. मुख्य मंडपात दुपारी १२.३० वाजता नाशिकचे ज्येष्ठ लेखक, नाटककार, कांदबरीकार मनोहर शहाणे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सत्कार संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचा हस्ते करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता ‘संवाद लक्षवेधी कवींशी’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रफुल्ल शिलेदार, किशोर कदम, सुचिता खल्लाळ, खालील मोमीन आणि वैभव जोशी हे त्यांचा काव्यप्रवास उलगडून दाखवणार आहेत. दुपारी ३ ते ५ वाजता कथाकथन व परिसंवाद होणार आहे. मराठी नाटक-एक पाऊल पुढे, दोन पावलं मागे या विषयावर परिसंवाद होणार आहे. पॉलिटेक्निक बिल्डिंगमधील उपमंडपात दुपारी प्रकाशन मंच उद्घाटन व महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या संदर्भातील ग्रंथांचे प्रकाशन केले जाईल. दुपारच्या सत्रात ‘स्मृतीचित्रे : लक्ष्मीबाई टिळक’ या विषयावर परिचर्चा आयोजित केली आहे. या चर्चेचे सूत्रधार डॉ. एकनाथ पगार आहेत. यात प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी, रेखा इनामदार साने, डॉ. गजानन जाधव आणि डॉ. मोना चिमोटे हे सहभागी होणार आहेत. दुपारी ४.३० वाजता कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार या विषयावर जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता आनंदयात्रा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

तिसरा दिवस (रविवार, दि. ५ डिसेंबर)

मुख्य मंडप : सकाळी ९.३० ते ११ वाजता ‘शेतकर्‍यांची दु:स्थिती, आंदोलने, राजसत्ताचा निर्दयपणा’, ‘लेखक कलावंताचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका’ या भास्कर चंदनशीव यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या परिसंवादामध्ये आमदार बच्चू कडू, रमेश जाधव, मिलिंद मुरुगकर व संजय आवटे यांचा सहभाग असेल. दुपारी ११.३० ते १ वाजता नाशिक जिल्ह्याची निर्मिती – १५१ वर्षांतील वाटचाल, विकास आणि संकल्प या विषयावर परिसंवाद होणार आहेत. दुपारी १.३० ते ३ वाजता वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण या विषयावर परिसंवाद गिरीश कुबेर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सायंकाळी ४ ते ७ वाजता समारोप समारंभ होईल. यावेळी विशेष पाहुणे म्हणून खासदार शरद पवार, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित राहणार आहेत. रात्री ८ ते १० वाजता ‘जय जय माय मराठी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यात अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, मृण्मयी देशपांडे, नंदेश उमप, वैशाली माडे, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर सहभागी होणार आहेत. खजूर गार्डन : सकाळी ९ ते १० वाजता बालसाहित्य समजून घेऊया, सकाळी १० वाजता मुलांशी गप्पागोष्टी, सकाळी १०.३० वाजता खगोल ते भूगोल, दुपारी १२ वाजता कल्पनांमधील नाविन्यता व विज्ञान या विषयावर चर्चा होणार आहे. फार्मसी सभागृह : सकाळी ११ ते १ वाजता ‘ऑनलाईन वाचन – वाङमय विकासाला तारक की मारक’ हा परिसंवाद डॉ. दिलीप धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

- Advertisement -

परिसंवादात वक्ते म्हणून श्रुतीश्री वडगबाळकर, धनंजय गांगळ, श्रीमंत माने, डॉ. विलास साळुंके, मयूर देवकर यांचा सहभागी होणार आहेत. दुपारी साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा : गरज की थोतांड – डॉ. नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या परिसंवादामध्ये वृषाली देशपांडे, डॉ. भगवान कारे, डॉ. वृंदा भार्गवे, इब्राहिम अफ़गाण, प्रा. भास्कर ढोके यांचा सहभाग असेल.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -