घरदेश-विदेशसरकार पाडण्यासाठी काँग्रेस आणि तिस्ता सेटलवाडमध्ये आर्थिक व्यवहार

सरकार पाडण्यासाठी काँग्रेस आणि तिस्ता सेटलवाडमध्ये आर्थिक व्यवहार

Subscribe

विशेष चौकशी पथकाच्या अहवालातील खळबळजनक माहिती

बहुचर्चित गुजरात दंगल प्रकरणानंतर गुजरातमधील तत्कालीन भाजप सरकार पाडण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाले असल्याची खळबळजनक माहिती विशेष चौकशी पथकाच्या (एसआयटी) अहवालातून समोर आली आहे. एसआयटीच्या अहवालातील माहितीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये शनिवारी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखीन तीव्र झाल्या.

गुजरात दंगलीनंतर काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल आणि सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी भाजप सरकारविरोधात कट रचल्याचे एसआयटीने आपल्या अहवालात म्हटले आहे. गुजरातमधील तत्कालीन भाजपचे सरकार पाडण्यासाठी आणि गुजरात दंगल प्रकरणात तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह आणखी काही भाजपचे नेते तसेच काही निरपराध नागरिकांना अडकवण्याच्या राजकीय हेतूने तिस्ता आणि त्यांचे सहकारी काम करत होते, असाही आरोप यानंतर भाजपकडून करण्यात येत आहे, तर आगामी गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप करण्यात येत असल्याचे अहमद पटेल यांच्या कन्या मुमताज पटेल यांनी म्हटले आहे. निवडणुकीमुळे असे घाणेरडे आरोप केले जात असून विरोधकांची प्रतिमा यामाध्यमातून डागाळली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

तिस्ता यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याची इच्छा होती, त्यासाठी त्यांनी राज्यातील भाजप सरकारविरोधात कट आखला होता. यातून गुजरातची प्रतिमा डागाळण्याचा कट अहमद पटेल यांच्या इशार्‍यावर रचण्यात आल्याचे एसआयटीने म्हटले आहे. गुजरात पोलिसांकडून तिस्ता सेटलवाड आणि माजी आयपीएस अधिकारी आर.बी. श्रीकुमार यांच्या जामीन अर्जाला विरोध करत दोन साक्षीदारांचा हवाला देत न्यायालयात हा चौकशी अहवाल दाखल केला आहे. भाजपचे सरकार पाडण्यासाठी तिस्ता सेटलवाड आणि अहमद पटेल यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचेही एसआयटीने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

अहमदाबाद येथील शाहीबागमधील सर्किट हाऊसमध्ये झालेल्या एका बैठकीत अहमद पटेल यांनी सेटलवाड यांना २५ लाख रुपये दिले. त्या आधीच्या बैठकीत ५ लाख रुपये देण्यात आले होते. या बैठकीत काही राजकीय नेते उपस्थित होते. हा पैसा गुजरात मदत नावाने जमा करण्यात आला होता. यासोबत सेटलवाड यांनी गुजरात गोध्रा रेल्वे जळीत कांडानंतर एका आठवड्यात मदत शिबिराचा दौरा केला, तसेच राजकीय नेत्यांसोबत बैठकाही घेतल्या. या दंगलीच्या घटनेला चार महिने उलटल्यानंतर सेटलवाड यांनी अतिशय गुप्तपणे तत्कालीन आयपीएस अधिकारी संजीव भट्टसोबत अहमद पटेल यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती, असाही उल्लेख या अहवालात असल्याचे समजते.

- Advertisement -

तिस्ता सेटलवाड यांचा केंद्र सरकारने २००७ साली पद्मश्री पुरस्काराने गौरव केला. यावेळी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी होती. या महत्त्वाकांक्षेसाठी त्यांनी हे प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. तिस्ता सेटलवाड यांनी गुरातमधील दंगल पीडितांच्या नावे पैसा गोळा करत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला जात आहे. त्यांनी हा पैसा आपल्या खासगी कामांसाठी वापरल्याचेही म्हटले जात आहे. तिस्ता सेटलवाड यांनी यातील ६३ लाख रुपये ‘सिटीजन फॉर जस्टिस अ‍ॅण्ड पीस’ (सीजेपी) संस्थेच्या आयडीबीआयमधील बँक खात्यात आणि ८८ लाख रुपये युनियन बँक ऑफ इंडियाच्या सबरंग ट्रस्टच्या खात्यात जमा केले होते. याच पैशात मोठा गैरव्यवहार झाल्याचे एसआयटीने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -