घरफिचर्ससारांशआषाढाला पाणकळा

आषाढाला पाणकळा

Subscribe

आषाढाच्या सुरूवातीला पावसाने चांगली सलामी दिली असली तरी उर्वरित काळात पाऊस कसा राहील हे आता नेमके सांगणे अवघड आहे. यंदा सरासरीप्रमाणे पाऊस होईल असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मागील तीस ते पस्तीस वर्षातील वार्षिक पावसाचा आढावा घेतल्यास असे दिसते की राज्यातील पावसाच्या प्रमाणात आणि वितरणातही फार मोठा बदल झालेला दिसून येत नाही. परंतु वादळीवारा वाहण्याच्या आणि गारपिटीचा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

आषाढाला पाणकळा
सृष्टी लावण्याचा मळा
दु:ख भिरकाऊनी येती
शब्द माहेरपणाला

ना.धो.महानोरांच्या गीतातल्या या ओळीप्रमाणेच सबंध सृष्टीचा मळा हिरव्या लावण्याने फुलला आहे. राज्याच्या बहुतांश भागात आषाढातला पाऊस चांगला बरसला आहे. आषाढ महिना अर्धाअधिक सरला आहे. मागील वर्षी आषाढात पावसाने बरीच ओढ दिली होती. यंदा मात्र मागील आठवड्यात संततधार पावसाने नदी, नाले ओहोळ भरभरुन वाहत आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षा ३० टक्के कमी असणार्‍या पावसाने दुसर्‍या आठवड्यात मात्र सरासरी पूर्ण केली आहे. अर्थात हे सर्वदूर चित्र नाहीय. मध्य, पश्चिम, उत्तर महाराष्ट्रात बहुतांश भागात चांगला पाऊस कोसळला असला तरी विदर्भ, मराठवाड्यातील बर्‍याच भागाला अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

- Advertisement -

उत्तर भारतात पाऊस अद्याप तसा कमीच आहे. जुलै महिन्याच्या दुसर्‍या-तिसर्‍या आठवड्यापासून मान्सून उत्तरेकडे सरकण्याची चिन्हे आहेत. याचा अर्थ आपल्याकडील महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होऊन तो उत्तर भागात वाढेल.
पुढे २५ जुलैच्या आसपास चांगला पाऊस पडू शकतो.

हवामान अभ्यासक अमोल कुटे यांच्या मते आपल्याकडील पावसाचा जोर १५ जुलैपासून कमी कमी होत जाणार आहे. कोकण घाटमाथ्यावर तसा तो राहणारच आहे. मुंबईसह नाशिक, नगर भागात पावसाचे चांगले चित्र असले तरी मराठवाड्यातील नांदेड, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने अद्याप ओढ दिली असल्याने पावसाचे असमान चित्रच दिसत आहे.

- Advertisement -

पाऊस सरासरी गाठेल?
आषाढाच्या सुरूवातीला पावसाने चांगली सलामी दिली असली तरी उर्वरित काळात पाऊस कसा राहील हे आता नेमके सांगणे अवघड आहे. यंदा सरासरीप्रमाणे पाऊस होईल असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मागील तीस ते पस्तीस वर्षातील वार्षिक पावसाचा आढावा घेतल्यास असे दिसते की राज्यातील पावसाच्या प्रमाणात आणि वितरणातही फार मोठा बदल झालेला दिसून येत नाही. परंतु वादळीवारा वाहण्याच्या आणि गारपिटीचा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जुलै आणि सप्टेंबरमध्ये पावसाच्या प्रमाणात थोडीशी वाढ तर जून आणि ऑगस्ट महिन्यामध्ये थोडीशी घट झालेली आढळून आली आहे. सरासरी पावसाचा विचार केल्यास मान्सून हंगामात सर्वाधिक पाऊस कोकणातील जिल्ह्यात (२४००-२५०० मिमी), पश्चिम महाराष्ट्रात (४५०-६००मिमी), तर सर्वात कमी सांगली (४५४ मिमी) आणि अहमदनगर (५९१ मिमी) पाऊस पडतो.

एकूण सरासरी वार्षिक पावसाच्या(११४७ मिमी) प्रमाणात मान्सून हंगामात ८९ टक्के पाऊस पडतो, तर कोकणात मात्र ७३-७६ टक्के इतकाच पाऊस पडतो. तसेच मान्सून हंगामाच्या पडणार्‍या पावसाच्या (१०२१ मिमी) प्रमाणात सर्वाधिक पाऊस ३४१मिमी (३३%) पाऊस जुलैमध्ये, त्यानंतर ऑगस्टमध्ये २८१ मिमी (२८%)जूनमध्ये २१९ मिमी (२१%) आणि सप्टेंबरमध्ये १८०मिमी(१८%) पाऊस पडतो.

असे असले तरीही पावसाच्या पडण्याचा रितीमध्ये मासिक तफावत जिल्हानिहाय २५ ते ७० टक्के इतकी मोठी असून कोकणात सर्वात कमी तफावत (१७ ते ३५%) आढळते. म्हणजेच प्रत्येक वार्षिक जिल्हानिहाय, मासिक निहाय पाऊस पडण्याचे प्रमाण सारखे बदलत असते, परंतु हंगामनिहाय तफावत मात्र कमी असून मासिक तफावत अधिक आहे आणि त्याहून अधिक तफावत साप्ताहिक पावसाच्या वितरणात आढळून येते. मौसमी हंगामात पडणार्‍या पावसाचे सरासरी दिवस १२२ आहेत. कोकणात ६० ते ७० दिवस असून, मध्य महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ व मराठवाड्यात ३५ ते ४५ पावसाचे दिवस आहेत. परंतु मध्य महाराष्ट्र व त्यास लागून असलेल्या काही जिल्ह्यातील भागात ३७ दिवसाहून कमी पावसाचे दिवस असतात.

मुसळधार पावसाच्या दिवसाचे घटनांचे प्रमाण कोकणात ८ ते ११ असून उर्वरित महाराष्ट्रात ३ ते ५ दिवस आहेत. नंदुरबार, जळगाव, भंडारा, कोल्हापूर व रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसते. तर एकूण पावसाच्या दिवसात घट झाल्याचे आढळून आले आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर,औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या दिवसात घट झालेली दिसून येते. तर उर्वरित जिल्ह्यात कुठलाही बदल जाणवत नाही.

८० टक्के क्षेत्र पावसावरच अवलंबून
आपल्या राज्याचे भौगोलिक क्षेत्र ३०७ लाख हेक्टर असून त्यापैकी शेतीखाली जवळपास २३२ लाख हेक्टर आहे. यापैकी निव्वळ पेरणीखालील क्षेत्र १७५ लाख हेक्टर असून खरिपाचे १४१ लाख हेक्टर तर रब्बीचे ५१ लाख हेक्टर एवढे क्षेत्र पेरणीखाली आहे. यामध्ये फळपिका खालील क्षेत्र सुमारे साडेचौदा लाख हेक्टर, भाजीपाला पिकाखालील साडेचार लाख हेक्टर आणि फुलशेती खालील जवळपास १७००० हेक्टर आहे. अजूनही एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास ३३ लाख हेक्टर क्षेत्र वहिताखाली आणता येईल. तसेच जवळपास ४० लाख हेक्टर (२० टक्के) क्षेत्र ओलिताखाली असून ८० टक्के पावसावर आधारित आहे. (कृषी विभाग आणि जलसिंचन विभागाची सरकारी आकडेवारीनुसार). परंतु प्रत्यक्षात एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी जेमतेम साडे सोळा ते सतरा टक्के बागायती आहे. तंत्रज्ञान विज्ञान आणि व्यवस्थापनाचा सर्वोच्च वापर केल्यानंतरही राज्यातील सर्वाधिक ३० ते ३२ टक्के क्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल (असा अनेक अभ्यासकांनी निष्कर्ष मांडलेला आहे). म्हणजेच आज ८० टक्के तर भविष्यात ७०टक्के क्षेत्र हे पावसावरच अर्थात मान्सूनवर अवलंबून असणार आहे.

महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण, पूर्व विदर्भ, पश्चिम घाट पट्ट्यात भात, नागली, वरई, तर विदर्भ मराठवाड्यात कापूस, तूर, सोयाबीन, खरीप ज्वारी, मका आणि कोकण वगळून इतर सर्वत्र भागात कमी अधिक प्रमाणात बाजरी, मूग, मटकी, कुळीथ, तीळ, कारळा, भुईमूग इत्यादी पावसावर आधारित पिके घेतली जातात. ही सर्व पिके अन्न सुरक्षेत येणारी आणि जैवविविधता जोपासणारी आहेत. मान्सून येण्याच्या तारखेत तांत्रिकदृष्ठ्या भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार काही प्रमाणात बदल झालेला दिसतो.

मान्सून माघारी जाण्याचा काळात मात्र विलंब झालेला आढळून येतो आहे आणि एक आठवड्याने उशिरा मान्सून निघून जाण्याची तारीख निश्चित केलेली आहे. म्हणजेच १-२ आठवड्यांनी मान्सून हंगाम महाराष्ट्रात वाढलेला आहे.

शेतीसमोरील मोठे आव्हान
शेतीसमोर अशी अनेक आव्हाने उभी राहत असताना बदलणारे पाऊसमान हे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. एकटा दुकटा शेतकरी यात टिकाव धरु शकत नाही. त्यासाठी एकत्र येऊन शिवारात अत्याधुनिक हवामान अंदाज यंत्रणा बसवणे, त्या आधारे पिकांच्या कामकाजाचे नियोजन करणे शक्य आहे. नुकसान झाल्यानंतर सक्षम पिकविमा असणे हा ही पर्याय आहे. मात्र ती यंत्रणा आतापर्यंत यशस्वी ठरु शकली नाही. कारण प्रत्यक्ष नुकसान, विमा कंपनीकडून मिळणारी भरपाई याबाबत ताळमेळ नाही. यामुळे आपत्तीत शेतकर्‍यांना संरक्षण देऊ शकेल अशी व्यवस्था अद्याप तरी उभी राहू शकली नाही. या स्थितीत तंत्रज्ञानच शेतकर्‍यांना उपयुक्त ठरु शकते.

शेती हा कायम निसर्गावर आधारलेला व्यवसाय राहिला आहे. तसा तो कालही होता आणि आजही आहे. जिरायती, कोरडवाहू शेती ही तर पूर्णपणे पावसावर अवलंबून राहते. मागील तीन ते चार दशकांत शेतीची काही प्रमाणात जिरायतीकडून बागायतीकडे वाटचाल झाली. मात्र पावसावरील अवलंबित्व कायम राहिलं. विदर्भातील सोयाबीन उत्पादक असो की नाशिकमधील द्राक्ष उत्पादक प्रत्येकजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. वाट पाहूनही पाऊस वेळेवर येतोच असा भरवसा आता राहिला नाही. बहुतांश वेळा नको तेव्हा भरपूर येतो आणि मोठे नुकसान करुन जातो. मागील वीस पंचवीस वर्षापासून पावसाची नियमितता बिघडली आहे. मागील १० वर्षांपासून तर याची तीव्रता जास्तच वाढली आहे. अवेळी, अवकाळी येणार्‍या पावसाचा ऐन बहरातील पिकांना फटका बसतो. परिणामी शेतकर्‍यांचे अर्थकारण बिघडून जाते. हे सातत्याने घडत असताना हेच शेतीसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणून उभे राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -