ठाणे जिल्ह्यात खड्ड्यांचा दुसरा बळी

डोंबिवलीत खड्ड्यामुळे तरुणाचा मृत्यू

accident
प्रातिनिधक छायाचित्र

मुंबईसह महानगरांमध्ये रस्त्यांवरील खड्डे हा चर्चेचा विषय ठरलेला असतानाच ठाणे जिल्ह्यात खड्ड्याने दुसरा बळी घेतल्याचे वृत्त आहे.

नुकत्याच गेल्या काही दिवसांपूर्वी घोडबंदर येथे खड्ड्यांमुळे तोल जाऊन दुचाकीस्वार तरुणाचा बळी गेल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता डोंबिवली येथे शनिवारी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातच खड्ड्यांमुळे दोन बळी गेल्यानंतर याबाबत नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय तातडीने मार्गी लावण्याची मागणी आता केली जात आहे.

अगणित खड्ड्यांमुळे कल्याण-डोंबिवलीतील अनेक रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. त्याला काटई-बदलापूर पाईपलाईन रोडदेखील अपवाद नाही. याच रस्त्यावर शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीवरून जाणार्‍या एका तरुणाचा मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून हा तरुण शेजारून जाणार्‍या भरधाव वेगातील केडीएमटीच्या बसखाली आला. या विचित्र अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार केडीएमटीच्या बेजबाबदार चालकावर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकित थैवा (२६) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. अंबरनाथ येथील एमआयडीसी रोडवर असलेल्या आनंदनगरमधील गुड मॉर्निंग सोसायटीत राहणारा अंकित हा नवी मुंबईतील घणसोली येथील हेल्थ केअर फार्मा कंपनीत काम करीत होता. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तो आपल्या दुचाकीवरून कामाला जाण्यासाठी निघाला होता. अंकित बदलापूर रोडने काटई सर्कलकडे जाणार्‍या रोडवर खोणी म्हाडा वसाहतीसमोर आला असता रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यात त्याची दुचाकी जोरात आदळली. त्याचवेळी बाजूने चाललेल्या केडीएमटीच्या भरधाव वेगातील बसखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी केडीएमटीच्या बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पावसामुळे कल्याण-डोंबिवलीतील सार्‍याच रस्त्यांची वाताहत झाली आहे. यास बदलापूर पाईपलाईन रोडदेखील अपवाद नाही. या रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्ड्यात आदळून छोट्या वाहनांचे अपघात होत आहेत. याबाबत डोंबिवली एमआयडीसीचे उपअभियंता विजय शेलार यांना विचारले असता ते म्हणाले की, कल्याण-डोंबिवली व आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र रस्त्यात खड्डे पडले आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून पावसामुळे खड्ड्यातील माती आणि खडी बाहेर पडते. पाईपलाईनच्या एका बाजूकडील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले आहेत, मात्र दुसर्‍या बाजूकडील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करायचे आहेत. ते काम लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.