परीक्षा केंद्राबाहेर आगीचे लोळ; धुरामुळे विद्यार्थ्यांची पळापळ

जव्हारच्या टेकडीवर असलेल्या गोखले महाविद्यालयाच्या इमारतीमधील तीन खोल्यांमध्ये बारावीची परिक्षा सुरु होती. विद्यार्थी पेपर लिहण्यात मग्न असतानाच अचानक महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या गवताने पेट घेऊन मोठी आग लागली. आगीमुळे धुराचे लोट उसळून वर्गांमध्ये धूर पसरला होता. आग लागल्याची माहिती मिळताच घबराटीमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही पळापळ झाली.

जव्हारः जव्हार शहरातील गोखले महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या सुक्या गवताला आग लागून धुराचे लोट उसळल्याने परीक्षा केंद्रात एकच गोंधळ उडाला होता. आगीच्या भीतीने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही पळापळ झाली. अग्निशमन दलाने आग विझवल्यानंतर अर्धा तासाने पुन्हा परीक्षा सुरु करण्यात आली. याप्रकाराने मानसिक धक्का बसल्याने विद्यार्थ्यांच्या पेपर लिहीण्यावर परिणाम झाल्याने गुणांवरही दुष्परिणाम होण्याची भिती पालकांनी व्यक्त केली आहे.
जव्हारच्या टेकडीवर असलेल्या गोखले महाविद्यालयाच्या इमारतीमधील तीन खोल्यांमध्ये बारावीची परिक्षा सुरु होती. विद्यार्थी पेपर लिहत असतानाच अचानक महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या गवताने पेट घेऊन मोठी आग लागली. आगीमुळे धुराचे लोट उसळून वर्गांमध्ये धूर पसरला होता. आग लागल्याची माहिती मिळताच भीतीमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही पळापळ झाली. सर्व विद्यार्थी भीतीपोटी वर्गाबाहेर पळाले. शाळा प्रशासनाने लागलीच जव्हार नगरपालिकेच्या प्रशासनाला कळवून अग्निशमन विभागाला पाचारण केले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही.

या गोंधळामुळे परीक्षेचा किमान अर्ध्या तासाचा वेळ गेला. परिस्थिती नियंत्रणात आल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा वर्गात बसवून पेपर लिहीण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यासाठी वेळही वाढवून देण्यात आली होती. परीक्षा केंद्रावरील ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास झाला. याचा परिणाम हा विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांवर होणार असल्याने पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

शिपायाने आग लावल्याचा संशय
परिक्षा केंद्राच्या परिसरात त्याच शाळेत काम करणाऱ्या एका शिपायाने दारूच्या नशेत आग लावली असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे. शिक्षकांवरील राग काढण्यासाठीच त्या शिपायाने हे कृत्य केल्याचा आरोप केला जातो. याप्रकरणी आता शाळा प्रशासन चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले. पण, दोषी शिपायावर शाळा प्रशासन शिक्षा करेल की नाही असा सवालही पालक करत आहेत.

 

सुरक्षेची केली मागणी
परीक्षा केंद्रावर आग लागल्याचे समजताच विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वर्गाबाहेर काढण्यात आले होते. त्वरित अग्निशमन पथक बोलवून आगीवर नियंत्रण आणले. विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आला. परीक्षा केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने सोयीसुविधा वाढवण्यासाठी महाविद्यालयाला सूचना देण्यात आल्या आहेत.
— अमोल जंगले, प्रभारी गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती, जव्हार