अडीच वर्षे मंत्री असताना मलिक देशद्रोही वाटले नाही; खडसेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशद्रोह्याबद्दलच्या त्यांच्या वक्तव्याचा आज विधानपरिषदेच्या सभागृहात खुलासा केला. पण यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

Eknath Khadse's criticism of the Chief Minister

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (ता. २ मार्च) विधानपरिषदेच्या सभागृहात त्यांनी केलेल्या वक्तव्याचा खुलासा केला आहे. मी देशद्रोही हे अजित पवार किंवा अंबादास दानवे यांना बोललो नाही तर हे मी नवाब मलिक यांना बोलले असे स्पष्ट केले. परंतु यावरून सभागृहामध्ये आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत शाब्दिक हल्ला केला.

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, “सात महिन्यामध्ये या सरकारने नेमके काय दिवे लावले. मागच्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार असताना हे गुलाबराव, एकनाथराव हे सर्व राव मंत्री होते. त्यामुळे तुम्ही कसे काय चांगले किंवा वाईट असे म्हणू शकता. आमच्याकडे होते तेव्हा चांगले नव्हते, तुमच्याकडे आले म्हणजे चांगले झाले, असे आहे का?” असा खोचक प्रश्न खडसेंनी उपस्थित केला.

आधीच्या सरकारमध्ये एकनाथराव हे नगरविकास खात्याचे मंत्री होते. त्यावेळी त्यांना नवाब मलिक गद्दार दिसला नाही, असा टोला खडसेंनी लगावला. त्यावेळी मांडीला मांडी लावून नवाब मलिक यांचा राजीनामा मागू नका असं बोलणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या नवाब मलिक यांच्या बाबतीतल्या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली.

पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, ज्यावेळी एकनाथ शिंदे मंत्री होते, तेव्हा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत नवाब मलिक हे देशद्रोही आहे असे का नाही म्हंटले? देशद्रोहाचे कोणी समर्थन करत नाही पण सुप्रीम कोर्टाकडून त्यांचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, ते आधी सिद्ध होऊद्यात, असे म्हणत खडसेंनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या देशद्रोह्यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे उत्तर, ‘आम्ही सुद्धा ४० गद्दारांना…’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वक्तव्यावर खुलासा करत म्हंटले आहे की, “जो हक्कभंग विरोधी पक्षाकडून देण्यात आला आहे, त्या संदर्भात माझं वक्तव्य नाही. माझं वक्तव्य अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्याविरोधातील नव्हतं, तर माझं वक्तव्य हे नवाब मलिक यांच्याविरोधातील होतं. देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि हसीना पारकर यांच्याबाबत होत.” असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.