घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव कल्याण-डोंबिवलीत सापडला पहिला रुग्ण

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव कल्याण-डोंबिवलीत सापडला पहिला रुग्ण

Subscribe

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमधून दुबई आणि दिल्लीमार्गे 24 नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.

कल्याण डोंबिवलीतील या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या १२ अति जोखमीच्या निकट आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरुणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. याशिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. यादरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही तथापी डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.

- Advertisement -

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या १७ हजार १०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबरपासून आतापर्यंत ८ प्रवासी कोविडबाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे.

नागरिकांना न घाबरण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

- Advertisement -

देशात ओमायक्रॉनचे चार रुग्ण
कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडल्यानंतर गुजरातमध्ये झिम्बाब्बेहून परतलेल्या 72 वर्षीय वृद्धाला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. गुजरातच्या जामनगर येथील हा ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आहे. तसेच महाराष्ट्रात एक रुग्ण सापडल्याने आता देशामध्ये ओमायक्रॉनचे चार रुग्ण झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -