घरमहाराष्ट्रअलिबाग मध्ये मच्छिमार बोट बुडाली

अलिबाग मध्ये मच्छिमार बोट बुडाली

Subscribe

८ खलाशी बचावले

उरण तालुक्यातील करंजा बंदरातून मासेमारीसाठी जाणारी बोट अलिबागजवळील वरसोली समुद्रात बुडाल्याची घटना गुरुवारी घडली. या दुर्घटनेत बोटीला जलसमाधी मिळाली असली तरी केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यावरील ८ खलाशी सुदैवाने बचावले आहेत.

१ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीसाठी शासनाने निर्बंध घातल्यामुळे १ ऑगस्टचा मुहुर्त साधत मोरा, दिघोडे, करंजा बंदरात नांगरून ठेवलेल्या बोटी पहाटे खोल समुद्रात मासेमारीसाठी रवाना झाल्या. करंजा बंदरातून सुरेखा राजेश नाखवा यांची ‘नमो शिवाय’ (आयएनडी/एमएच-एमएम १२२३) ही बोट मासेमारीसाठी लागणारे साहित्य व आठ खलाशांना घेऊन निघाली होती. बोट खांदेरी व चाहुलखाद्या दरम्यान आली असता अचानक बंद पडली. त्यानंतर बोटीला चालू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र बोट सुरू झाली नाही. त्यामुळे नाखवाने बोटीचा नांगर टाकला. परंतु लाटांच्या मार्‍यामुळे नांगरही वाहून गेला. परिणामी बोट पुढे जाऊन खडकावर आपटली. यावेळी प्रसंगावधान राखून व जिवावर उदार होत आठही जणांनी पाण्यात उड्या घेतल्या. डिझेल टाकी, मासे साठविण्याचे खोके, तसेच बोयाच्या सहाय्याने त्यांनी कसाबसा जवळचा किनारा गाठला. सर्वांना तात्काळ अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

- Advertisement -

वसंत बामा पाटील, धावू गोविंद तांडेल, गजानन अर्जुन जोशी, नितीन जनार्दन ठाकूर, उमाजी बाळाजी पाटील, रुपेश जनार्दन पाटील, नारायण मंगल्या कोळी व परशुराम शांताराम पाटील अशी या खलाशांची नावे आहेत. समुद्राला उधाण आले नसल्याने खलाशांचे प्राण वाचले आहेत. आठही खलाशी सुखरूप असल्याची माहिती महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचे करंजा बंदर निरीक्षक राहुल धायगुडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -