घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023Video : ही दोस्ती तुटायची नाय! राजकीय शत्रुत्वानंतरही ठाकरे आणि फडणवीस एकत्र

Video : ही दोस्ती तुटायची नाय! राजकीय शत्रुत्वानंतरही ठाकरे आणि फडणवीस एकत्र

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन परिसरात एकत्र एन्ट्री घेतली, त्यामुळे सगळ्यांनीच भुवया उंचावल्या. या दोघांच्या एकत्र येण्याने युतीचा नवा फॉर्म्युला तयार होणार का अशी चर्चाही दबक्या आवाजात रंगली.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – पंचवीस वर्षांची दोस्ती मोडून वेगळे झालेले दोन नेते आज विधानभवन परिसरात एकत्र येताना पाहुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. युती तुटल्यानंतर नियमितपणे एमेकांवर टीकास्त्र डागणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन परिसरात एकत्र एन्ट्री घेतली, त्यामुळे सगळ्यांनीच भुवया उंचावल्या. या दोघांच्या एकत्र येण्याने युतीचा नवा फॉर्म्युला तयार होणार का अशी चर्चाही दबक्या आवाजात रंगली. पंरतु, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम दिला.

२०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर २५ वर्षांची युती तुटली. भाजपाने दिलेला शब्द पाळला नसल्याचे सांगत तत्कालीन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत फारकत घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पाठिंबा दिला. यामुळे महाविकास आघाडी असं नवं राजकीय समीकरण महाराष्ट्राला पाहायला मिळालं. या अनाकलनीय राजकीय घडामोडीमुळे २५ वर्ष मैत्री निभावणारा पक्ष शत्रू झाला आणि पक्षाच्या जन्मापासूनच ज्यांच्याशी शत्रुत्व होतं ते पक्ष मित्र पक्षाच्या यादीत येऊन बसले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा वाढत गेला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्याची चोख भूमिका बजावली आणि त्यामुळे यांच्यातील दरी वाढत गेली.

- Advertisement -

हेही वाचा – जशी स्क्रीप्ट आली तशी वाचली असेल…, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

जून २०१९ मध्ये शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन भाजपासोबत हातमिळवणी केली. या घटनेमुळे उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपाविषयी आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची असलेली कटुता आणखी वाढली. एकाच व्यासपीठावर आल्यावरही या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं नाही. त्यामुळे आज या दोघांनी विधानभवन परिसरात एकत्र एन्ट्री घेतल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे विधान परिषेदेचे सदस्य आहेत. मराठी भाषा भवनासंदर्भात आज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे विधानभवनात आले होते. यावेळी, गप्पा मारत, चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज एकत्र विधानभवनात प्रवेश केला. त्यामुळे नवी युती होणार का असा प्रश्न खुल्यापणाने अनेकांनी मिश्किलीत तिथे विचारला. परंतु, चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून ठाकरेंनी या युतीबाबत नकार दिला.


आमचे केवळ हाय हॅलो

आमचे केवळ हाय- हॅलो एवढचं बोलणं झालं, असं स्पष्टीकरणही उद्धव ठाकरेंनी दिलं. फडणवीसांशी बोलणं झाल्यानंतर आता मोदींविरोधात तुम्ही सौम्य व्हाल, या प्रश्नावर त्यांनी आता कोणाला हाय -हॅलो करणेही पाप झाले आहे, असे उत्तर दिले. तसेच, मराठी भाषा भवन बांधण्याचा निर्णय आमच्या काळात झाला. आताच्या सरकारने एक वीटही रचली नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -