घरताज्या घडामोडीआत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत रेशनकार्डशिवाय मिळणार मोफत तांदूळ

आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत रेशनकार्डशिवाय मिळणार मोफत तांदूळ

Subscribe

प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबियांना मोफत तांदूळ देण्यात येणार आहे. या करता नाशिक जिल्ह्याला 1200 मेट्रिक टन तांदूळ प्राप्त झाला आहे. येत्या दोन दिवसात तांदूळ वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये, याकरता अन्नपूर्णा योजना व अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्यासह पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 50 लाख लोकांनी विविध योजनेंतर्गत धान्य उचल केली आहे.

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत पॅकेजची घोषणा केली. या योजनेंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबियांनाही मोफत तांदूळ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून जिल्हास्तरावर रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबियांची माहिती संकलित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 17 हजार 154 कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नाशिक शहर आणि मालेगाव शहराचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने येथील माहिती गुरुवार पर्यंत संकलित होईल यानंतर जिल्ह्यात तांदूळ वाटप सुरू करण्यात येईल, असे पुरवठा अधिकारी नरसीकर यांनी सांगितले.

- Advertisement -

यांना मिळेल लाभ

  • एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न गटातील कुटुंब
  • विस्थापित मजूर
  • रेशनकार्डसाठी अर्ज केला पण कार्ड न मिळालेले कुटुंब
  • ज्यांचे कार्ड ऑनलाईन झाले नाही असे कुटुंब
  • आर्थिकदृष्टया दुर्बल घटक
  • अंत्योदय, प्राधान्यक्रम योजनेत समाविष्ट नसलेले कुटुंब

आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्याला 1200 मेट्रिक टन तांदूळ प्राप्त झाला आहे. मनमाड आणि नाशिकच्या एफसीआय च्या गोदमातून या धान्याची उचल करण्यात येत आहे. आतापर्यंत 17 हजार कुटुंबियांची माहिती संकलित करण्यात आली आहे. लवकरच या धान्याचे वितरण सुरू केले जाईल.
अरविंद नरसीकर , जिल्हा पुरवठा अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -