मुंबईकरानो मिनी बसगाड्यांमधून फुकट प्रवास!

मुंबईकरांची दुसरी लाईफलाइन असलेल्या बेस्टने सुरू केलेल्या वातानुकूलित मिनी बसगाड्यांमधील प्रवाशांना तिकिट देण्यासाठी पुरेशा संख्येने वाहक नसल्यामुळे प्रवाशांचे पैसे वाचत असले तरी अगोदरच तोट्याच असलेल्या बेस्टचे मोठे नुकसान होत आहे. बेस्ट उपक्रमाच्या नियोजनाच्या अभावामुळे बुडत्याचा पाय तोट्यात अशी बेस्टची अवस्था होऊन बसली आहे. पण त्याविषयी बेस्ट प्रशासन उदासीन असल्याचेच दिसून येत आहे. इतक्या संख्येने वाहक ठेवणे आम्हाला शक्य नाही, असे उत्तर बेस्ट प्रशासनाकडून देण्यात येत आहे. खरे तर याला काही पर्याय शोधूण होणारे आर्थिक नुकसान थांबवण्याची गरज आहे.

वाहक नसल्याने बेस्टचे नुकसान

बेस्टचा वाढलेला तोटा भरुन काढण्यासाठी आणि प्रवासी संख्या वाढविण्यासाठी बेस्टने भाडे कपात केली तसेच बेस्टच्या ताफ्यात नवीन ६५० अत्याधुनिक वातानुकूलीत मिनी बसगाड्या आणल्या. मात्र या कोरोनाचा काळात शून्य नियोजनामुळे या एसी बसेसमध्ये प्रवासी नि:शुल्क प्रवास करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रवासी तिकीट काढण्यासाठी तयार असतात मात्र तिकीट काढण्यासाठी वाहक उपलब्ध नसतो.

विनावाहक पॉइंट टू पॉइट सेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. यादरम्यान बेस्टकडून अत्यावश्यक सेवेतील बसेस सुरु होत्या. मात्र आता अ‍ॅनलॉकची सुरुवात झाल्याने बेस्टकडून दररोज ३ हजार २२४ बसगाड्या चालवल्या जात असून दररोज ११ लाख ७२ हजार प्रवासी प्रवास करतात. लाकडाऊन आधी बेस्टची प्रवासी संख्या ३० लाखांवर होती. सध्या बेस्टच्या ६०० पेक्षा जास्त वातानुकूलित मिनी बसगाड्या धावत आहेत. या बसगाड्यामधून विनावाहक पॉइंट टू पॉइट सेवा दिली जाते. प्रवाशांची तिकीट काढण्यासाठी ठराविक स्टॉपवर कंडक्टरची नेमणूक करण्यात येते. सुरुवातीला या बसगाड्यांना चांगला फायदा मिळत होता. मात्र जेव्हा कोरोना संसर्ग वाढला तेव्हा या गाड्यांच्या वापराबाबत वेगळाच वाद निर्माण झाला होता. बेस्ट उपक्रमाने शासनाच्या नियमानुसार वातानुकूलीत मिनी बसमधील वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवली. प्रवाशांसाठी बसमधील खिडक्या उघड्या ठेवून बस चालवण्यात येत होत्या. आता पुन्हा बसेसमधील एसी सुरु करण्यात आले. दुसरी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वाहकांची कमतरता असल्यामुळे या बसेसच्या प्रवाशांना तिकीट मिळत नाही. फक्त प्रमुख बेस्ट स्टॉपवर तिकीट काढण्यात येेते. मध्येच कोणाला उतराचे असेल तिथे वाहक नसतो. त्यामुळे प्रवासी चालकांना पैसे देतात. मात्र चालक पैसे नाकारतात, कारण नियमानुसार त्यांना तिकीटांचे पैसे घेता येत नाही. त्यामुळे सध्या कोरोना काळात बेस्टचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

नियोजनाच्या अभाव

अ‍ॅनलॉकमुळे अनेक कंपन्या आणि कार्यालयांचे कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा बंद असल्याने बेस्टशिवाय प्रवासाठी दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बेस्टची प्रवासी संख्या वाढत आहे. मात्र बेस्टचा नियोजनचा अभाव दिसून येत आहे. मधल्या स्टॉपवरुन बेस्टच्या मिनी बसेसमधून प्रवास करण्यार्‍या प्रवाशांना तिकीट मिळत नाही. किंबहुना, त्यांना तिकीट देण्यासाठी स्टॉपवर वाहक नाही. चालक स्टॉपवर गाडी थांबवून प्रवाशांना तिकीट घेण्यास सांगतात, तेव्हा तेथील वाहक ही बस माझा कार्यक्षेत्रात येत नसल्याचे उत्तर देतात.

प्रत्येक बस स्टॉपवर कंडक्टर ठेवणे शक्य नाही. या बसेसकरिता ठराविक स्टॉपवर कंडक्टर ठेवलेले आहेत. जेव्हा ही सेवा सुरू केली तेव्हापासून आम्ही प्रवाशांकडून या सेवेबाबत सूचना मागवित आहोत. आलेल्या सुचनांनुसार आम्ही प्रवाशांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
– मनोज वराडे, जनसंपर्क अधिकारी, बेस्ट उपक्रम
बेस्टने भाडेतत्वावर घेतलेल्या मिनी एसी बसेसमध्ये असे प्रकार घडत असल्याचा तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत. आम्ही यासंबंधीची माहिती बेस्ट प्रशासन आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षांना दिली आहे. यावर लवकरात लवकर उपायोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा बेस्टचे मोठे आर्थिक नुकसान होत राहील.
– सुनील गणाचार्य, वरिष्ठ सदस्य, बेस्ट उपक्रम