घरमहाराष्ट्रनाशिकमित्राच्या बहिणीच्या लग्नाला जाणे पडले महाग; कार पाच वेळा पलटली

मित्राच्या बहिणीच्या लग्नाला जाणे पडले महाग; कार पाच वेळा पलटली

Subscribe

मित्रमैत्रिणी आई-वडिलांना न सांगता गेले होते संगमनेरला

नाशिकरोड : संगमनेरमध्ये मित्राच्या बहिणीचे लग्न सोहळा आटोपून नाशिकला परतणार्‍या केटीएचएम कॉलेजच्या मित्रमैत्रिणींच्या कारचा टायर फुटला. त्यानंतर भरधाव कार नाशिक-पुणे महामार्गावर दुभाजक ओलांडून नाशिककडून सिन्नरच्या दिशेने जाणार्‍या दोन वाहनांवर आदळली. या भीषण अपघातात पाच विद्यार्थी ठार झाले असून, चार विद्यार्थी गंभीर व तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, कार सुमारे दोनशे फूट अंतरावर पाच वेळा पटली होऊन समोरील वाहनांवर आदळली.

पोलिसांच्या माहितीनुसार, सिन्नर मोहदरी घाटात काल  संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सिन्नरकडून नाशिकरोडच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर (एम.एच.०३ एआर १६१५) दुभाजकाला आदळली. त्यानंतर भरधाव कार विरुद्ध दिशेच्या दुसर्‍या लेनमधून सिन्नरच्या दिशेने येणारी इन्होव्हा (एमएच १८ एएन ४३४३) व स्विफ्ट कार (एमएच १२ एसएफ ४५४२) या वाहनांवर आदळली. या भीषण अपघातात नाशिकच्या दिशेने येणार्‍या कारचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधिक्षक सोमनाथ तांबे, एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व मुटकुळे आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली, इतर वाहनातील प्रवासी व नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले.

- Advertisement -

हर्ष बोडके याने शुक्रवारी सकाळी नातेवाईकांची कार घेतल्याचे वडील दीपक यांना सांगितले. स्विफ्ट कारमध्ये आठ जण प्रवास करत होते. त्यापैकी सायली अशोक पाटील, हरीश दीपक बोडके, मयुरी अनिल पाटील व प्रतिक्षा घुले यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात साहील गुणवंत वारके याच्यावर सिन्नर येथील यशवंत हॉस्पिटल व गायत्री अनिल फडताळे हिच्यावर नाशिक येथील धाडीवाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचप्रमाणे नाशिककडून सिन्नरच्या दिशेने जाणारी सफेद रंगाच्या स्विफ्ट कारमधील सुनील ज्ञानेश्वर दळवी हे जखमी असून, इतर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

मोहदरी घाटातील गणपती मंदिर परिसरात अपघातातील जखमींना वाहतूक शाखेचे उपनिरिक्षक योगेश शिंदे व प्रवीण गुंजाळ, मोहदरी पोलीस पाटील श्रावण गायकवाड, हिरामण आगिलवे, माधव बोडके, बाळकृष्ण सदगीर, विजय बेनके आदींनी नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांतून जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले.

- Advertisement -

नाशिक-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

मोहदरी घाटात तीन वाहनांचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एमआयडीसी सिन्नर पोलीस व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर सुमारे दोन तासांनी वाहतूक सुरळीत झाली.

अशी आहेत मृतांची नावे

  • सायली अशोक पाटील (वय १७)
  • हर्ष दीपक बोडके (वय १७)
  • प्रतीक्षा दगू घुले (वय १७)
  • शुभम ताडगे
  • मयूरी अनिल पाटील.

हे आहेत जखमी

  • साक्षी नितीन घायाळ
  • साहील गुणवंत वारके
  • गायत्री अनिल फडताळे
  • सुनिल ज्ञानेश्वर दळवी

सायलीचे आई-वडिलसुद्धा गेले होते लग्नाला

कार अपघातामध्ये सायली पाटील हिचा मृत्यू झाल्याची माहिती केटीएचएम कॉलेजच्या शिक्षकांना समजली. शिक्षकांनी सायलीच्या आई-वडिलांशी संपर्क साधला. त्यावेळी तेसुद्धा एका लग्न सोहळ्यात उपस्थित होते. शिक्षकांनी पाटील दाम्पत्यास सायलीचा अपघातात झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

मित्रमैत्रिणी आई-वडिलांना न सांगता गेले होते संगमनेरला

हर्ष बोडके याने मामाची कार घेऊन कारला जात आहे, असे वडिलांना सांगितले. त्यानंतर सर्वजण मित्राच्या बहिणीच्या लग्नसोहळ्यासाठी बोडकेने आणलेल्या कारमध्ये बसून संगमनेरला गेले. लग्नसोहळा पार पाडल्यानंतर सर्वजण कारने नाशिकच्या दिशेने निघाले. मोहदरी घाटात कारचा अपघात झाला. त्यामध्ये पाच जण ठार व तिघे जखमी झाले. ही बाब पोलिसांसह नाशिकमधील नागरिक व केटीएचएम महाविद्यालयातील शिक्षकांना समजली. रात्री उशीरापर्यंत पोलिसांचे मृत व्यक्ती व जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. विशेष म्हणजे, अपघातात मृत झालेल्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांसह नातेवाईकांना मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती नव्हती.

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -