घरमहाराष्ट्रशिवसेना सोबत नसती तर भाजपचा आमदारांचा आकडा ४०-५० असता

शिवसेना सोबत नसती तर भाजपचा आमदारांचा आकडा ४०-५० असता

Subscribe

मी हेडमास्तर नाही, रिमोट कंट्रोलही नाही,शरद पवारांचे निरीक्षण

राज्यात १०५ जागा जिंकूनही सत्ता स्थापन न करता आल्याने भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. भाजपचे १०५ आमदार जिंकण्यात शिवसेनेचे मोठे योगदान असून शिवसेना सोबत नसती तर १०५ चा आकडा ४०-५० असता, असे निरीक्षण शरद पवार यांनी नोंदवले आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतीत हे निरीक्षण नोंदवताना शरद पवार यांनी बाळासाहेबांचा विचार, कामाची पद्धत ही भाजपशी सुसंगत नव्हती. बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपची पद्धत यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजनांचा सन्मान केला. बाळासाहेबांची भाजपसोबतची युती व्यक्तिसापेक्ष होती, अशी मते मांडली.

सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हे वाक्य विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. या वाक्यावरून अनेक विनोद देखील तयार झाले. मात्र, आता याच वाक्याचा आधार घेत शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला असून, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाल्याचे पवार म्हणाले.‘राजकीय नेत्याने जनतेला गृहीत धरू नये. भाजपचे ‘आता आम्हीच’ हे लोकांना आवडले नाही. कुठल्याही लोकशाहीतला नेता आपण अमरपट्टा घेऊन आलोय असा विचार करू शकत नाही. या देशातल्या मतदारांना गृहीत धरले तर तो कधी सहन करत नाही. इंदिरा गांधींसारख्या जनमानसात प्रचंड पाठिंबा असणार्‍या व्यक्तीलासुद्धा पराभव पहावा लागला होता. अटल बिहारी वाजपेयींसारख्या नेत्यालासुद्धा पराभव पहायला मिळाला’.

- Advertisement -

लॉकडाऊनबाबत पवार म्हणतात, सुरुवातीच्या काळात कठोरपणानं लॉकडाऊन करण्याची आवश्यकता होती. त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली. इथे तशी आवश्यकताच होती. एवढी कठोर भूमिका घेतली नसती तर कदाचित न्यूयॉर्कसारखी अवस्था इथे झाली असती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा थोडा उशिरा घेतला असं काहींना वाटलं असेल, पण त्यांनी तो निर्णय योग्य वेळी घेतला. मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे त्याच स्वभावाला साजेसाच हा निर्णय आहे. म्हणजे निर्णय घ्यायचाच, पण अत्यंत सावधगिरीने. निर्णय घेतल्यावर दुष्परिणाम होणार नाहीत याची खातरजमा जेवढी करून घेता येईल तेवढी करून घ्यायची आणि मग पाऊल टाकायचं. एकदा पाऊल टाकल्यावर मागे घ्यायचं नाही ही त्यांची कार्यपद्धती आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत काय फरक दिसतो? यावर पवार सांगतात, बाळासाहेब ठाकरे तडकाफडकी निर्णय घेऊन निर्णयाला सामोरे जात, पण बाळासाहेब कधीच सत्तेत नव्हते आणि उद्धव ठाकरे प्रत्यक्ष मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर आहेत. हा देखील फरक आहेच ना. बाळासाहेब हे प्रत्यक्ष सत्तेत नसले तरी सत्तेच्या पाठीमागचे एक मुख्य घटक होते. त्यांच्या विचाराने सत्ता महाराष्ट्रात आली हे महाराष्ट्राने आणि देशाने बघितले. आज विचाराने सत्ता आली नाही, पण सत्ता प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या संबंधीची जबाबदारी आताचे मुख्यमंत्री ठाकरे यांची आहे. हा फरक महत्त्वाचा आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होतोय का यावर भाष्य करताना पवार म्हणाले, कोरोनासारखं एवढे मोठे संकट आणि तीन विचारांचे तीन पक्ष, पण सगळे जण एका विचाराने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्या धोरणाच्या पाठीशी आहोत आणि या परिस्थितीला तोंड देताहेत. लोकांच्या पाठीशी मजबुतीने उभे राहताहेत. एकदिलाने काम सुरू आहे म्हणून हे घडू शकले. या तिन्ही पक्षांत यत्किंचितही नाराजी नाही. याचा अर्थ माझी खात्री आहे, हे एकदिलाने काम सुरू आहे म्हणून घडू शकलं.

मी महाविकास आघाडी सरकारचा हेडमास्तर तसेच रिमोट कंट्रोल नाही. हेडमास्तर असला तर तो शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधी चालत नाही. रिमोट चालतो कुठे? जिथे लोकशाही नाही तिथे. आपण रशियाचे उदाहरण पाहिले. पुतीन २०३६ पर्यंत अध्यक्ष राहणार. ही एकहाती सत्ताच आहे. लोकशाही वगैरे सगळे बाजूलाच केलेले आहे. त्यामुळे आपण म्हणू त्या पद्धतीने सरकार चालवले पाहिजे हा अट्टाहास आहे, पण इथे लोकशाही सरकार आहे आणि लोकशाहीचे सरकार रिमोट कंट्रोलने कधी चालू शकत नाही. मलाच ते मान्य नाही. सरकार मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळच चालवत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -