हक्कभंगाचा पुन्हा ‘सामना’; आधी बाळासाहेब, आता राऊत

व्यंगचित्रामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हक्कभंग समितीसमोर गेले होते. आता त्यांचेच शिल्लेदार मानले जाणारे संजय राऊत हे हक्कभंग समितीसमोर जाणार आहेत. राऊत यांनी विधिमंडळाबाबत आक्षेपार्ह विधान केले. या विधानामुळे संतप्त झालेले भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणला.

 

मुंबईः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बुधवारी हक्कभंगाची नोटीस देण्यात येणार आहे. नोटीस दिल्यानंतर त्यांना दोन दिवसांत हक्कभंग समितीसमोर हजर राहावे लागेल. राऊत यांच्या आधी बाळासाहेब ठाकरे हेही हक्कभंग समितीसमोर आले होते. त्यावेळी त्यांना शिक्षाही झाली होती. तेव्हा शरद पवार हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी सभागृहात एक प्रस्ताव मांडला आणि बाळासाहेबांची शिक्षा रद्द झाली होती.

सामना दैनिकात राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र काढले होते. हे व्यंगचित्र विधानसभा अध्यक्षांचे होते. त्यामुळे आर. आर. पाटील यांनी हक्कभंग आणला होता. सामनाच्या मुख्य संपादकाविरोधात हक्कभंग आणण्याचा निर्णय हक्कभंग समितीने घेतला होता. त्यानुसार तशी नोटीसही देण्यात आली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत हक्कभंग समितीसमोर गेले. चारवेळा हक्कभंग समितीसमोर बाळासाहेबांची चौकशी झाली. तेव्हा बाळासाहेबांना गोड किंवा अजून काही दिले जायचे. एका सदस्याने त्यांना विचारले होते की तुम्हाला गोड चालते का?. त्यावर बाळासाहेब म्हणाले होते, मी पैसे सोडून सर्वकाही खातो. त्यांनतर हक्कभंग समितीने बाळासाहेबांना शिक्षाही सुनावली होती. त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते. त्यांनी सभागृहात एक प्रस्ताव आणला आणि ही शिक्षा रद्द करण्यात आली. बाळसाहेबांच्या या हक्कभंगाचा किस्सा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ जानेवारी २०२३ रोजी सांगितला होता. विधिमंडळात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्यात आले. त्यावेळी भाषण करताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा किस्सा सांगितला होता.

व्यंगचित्रामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हक्कभंग समितीसमोर गेले होते. आता त्यांचेच शिल्लेदार मानले जाणारे संजय राऊत हे हक्कभंग समितीसमोर जाणार आहेत. राऊत यांनी विधिमंडळाबाबत आक्षेपार्ह विधान केले. या विधानामुळे संतप्त झालेले भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणला. बुधवारी खास या हक्कभंगावर सभागृहात चर्चा झाली.  राऊत यांच्या वक्तव्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही, अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली. त्यानंतर राऊत यांना हक्कभंगाची नोटीर जारी करण्यात आली आहे.

 

हक्कभंगाची शिक्षा

हक्कभंगाची नोटीस दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांना त्यात तथ्य वाटले तर संबंधिताला हजर राहण्याची नोटीस दिली जाते. त्यानुसार त्या व्यक्तिला हक्कभंग समितीसमोर हजर रहावे लागते. हक्कभंग समितीला शिक्षा ठोठावण्याचा अधिकार आहे. आरोपी सभागृहाचा सदस्य असेल तर त्याला निलंबित केले जाते. आरोपी बाहेरचा असेल तर त्याला ताकीद दिली जाते, समज दिली जाते, दंड ठोठावला जातो, आवश्यक वाटल्यास तुरुंगवासाचीही शिक्षा ठोठावण्याची तरतुद आहे. त्यामुळे राऊत यांना कोणती शिक्षा ठोठावली जाते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.