घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहार के भी जितने वाले को 'शुभांगी' कहते है; झुंज देत मिळवले...

हार के भी जितने वाले को ‘शुभांगी’ कहते है; झुंज देत मिळवले मोठे यश

Subscribe

नाशिक : ” कुठलाही राजकीय पाठिंबा, ना राजकीय वारसा, ना शिक्षण संस्था, ना सहकारी संस्था, ना आर्थिक बळ, ना कार्यकर्त्यांची फौज’ अश्या परिस्थितीतही दिग्गजांना अंगावर घेत दिलेली एकाकी झुंज, प्रस्थापितांना टक्कर देण्याची दाखवलेली धमक” एवढी प्रतिकूल परिस्थिती असतानाही मतदान रूपी मिळवलेल्या मोठ्या यशामुळे शुभांगी पाटील यांचा पराभव होऊन सुद्धा त्याच नाशिक पदवीधर निवडणुकीत तसेच राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेचा विषय बनल्या. अभावानेच होणारी घटना त्यांच्या सोबत घटली, त्या पराभूत होऊन सुद्धा सर्वच बाजूने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

पदवीधर निवडणूक अखेर पार पडली. या निवडणुकीमध्ये खरंतर सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात सुरस निर्माण झालेली होती. रोजच नवनवीन रंजक घडामोडी या निवडणुकीमध्ये घडताना दिसून येत होत्या. त्यातच शुभांगी पाटील या एका सुशिक्षित महिलेची राजकारणामध्ये एंट्री हा देखील मुद्दा या निवडणुकीने अधोरेखित केला. शुभांगी पाटील ह्या मूळच्या धुळे जिल्ह्यातील त्यांनी आपलं वकिलीचे शिक्षण पूर्ण केल. त्यानंतर शिक्षकी पेक्षा स्वीकारत पुढे काही संघटनाच्या माध्यमातून तसेच शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपलं कामकाज मागील काही वर्षापासून सुरू ठेवलेल आहे. खरंतर शुभांगी पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडित अशा कार्यकर्त्या होत्या. मात्र, नाशिक पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी  मागच्या काही वर्षांमध्ये केलेली तयारी केलेली होती. त्यामुळे उमेदवारीच्या अपेक्षेने भाजप मध्ये तीन महिन्यापूर्वीच प्रवेश केला होता. त्यांना भाजपाकडून उमेदवारीच्या शब्द देखील मिळाल्याचं नंतर स्पष्ट झालं.

- Advertisement -

मात्र, राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षांतर्गत घडामोडी घडून त्यामध्ये डॉ. सुधीर तांबे यांच्या जागी सत्यजित तांबे यांनी मागितलेली उमेदवारी त्यांना नाकारत डॉ. सुधीर तांबे यांनाच अधिकृत उमेदवारी देण्यात आली. त्यानंतरच खऱ्या अर्थाने घडामोडींना सुरुवात झाली, या सर्व घडामोडीच्या दरम्यान शुभांगी पाटील यांनी निवडणूक लढवायची हा निर्धार पक्का केला होता. जेव्हा सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि भाजपने आपला अधिकृत उमेदवार दिला नाही. शुभांगी पाटील यांच्या समवेत इतर दोन उमेदवार देखील भाजपकडून इच्छुक होते मात्र भाजपने कोणालाच अधिकृत उमेदवारी न दिल्याने सगळ्यांचीच गोची झाली. इतर दोन उमेदवारांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात भाजपला यश आलं मात्र शुभांगी पाटील अर्ज माघारीच्या दिवशी नॉटरीचेबल झाल्या. त्याआधी त्यांनी थेट मातोश्री गाठत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबाची मागणी केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेक घडामोडी घडायला सुरुवात झाली.

शुभांगी पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिला. तसेच महाविकास आघाडीच्या जागावाटपात त्यांच्या वाटेला सुटलेली नागपूरची जागा ही काँग्रेसला देऊ केली. त्याबदल्यात नाशिकची जागा आपल्याला मागून घेतली व शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या. खरंतर शुभांगी पाटील यांना प्रचारासाठी अवघे काही दिवस मिळाले होते मात्र या दिवसांमध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात पाचही जिल्ह्यामध्ये प्रचार केला. अनेक संस्था, संघटना, मतदार यांच्या गाठीभेटी घेत त्यांनी मतांचा जोगवा मागितला. त्यांच्या मेहनतीचेच यश म्हणून की काय शुभांगी पाटील तब्बल ३९ हजार ५३४ मतांपर्यंत मजल मारू शकल्या.

- Advertisement -
 यंत्रणेचा अभाव तरी प्रस्थापितांना दिली टक्कर

खरंतर, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही तशी यंत्रणेची निवडणूक म्हणून बघितली जाते.’ पदवीधरांना धरून आणून मतदान करून घ्यावे लागतं’ असं नेहमीच थट्टेने म्हटलं जातं. खरी परिस्थिती सुद्धा तशीच असते, ज्याच्याकडे शिक्षण संस्था मोठ्या शिक्षकांच्या, शासकीय कर्मचार्‍यांच्या संघटना यांचे पाठबळ लागते. तसेच, आर्थिक रसद, राज्यव्यापी चेहरा, राजकीय पार्श्वभूमी, वयक्तिक कार्यकर्त्यांची यंत्रणा असेल अश्या उमेदवारानेच ही निवडणूक लढवावी असंही म्हटलं जात. मात्र शुभांगी पाटील यांच्याबाबत विचार करायचा झाला तर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी लागणार्‍या यंत्रणेचा शुभांगी पाटील यांच्याकडे मोठा अभाव होता. तरी सुद्धा दृढ इच्छा आणि लढण्याची तयारी या जोरावरती त्यांनी या निवडणुकीमध्ये उडी घेतली. फक्त निवडणूक लढल्याच नाहीत तर डोळे विस्फार्ंनार यश देखील संपादन केला. निवडणुकीत बाजी जरी सत्यजित तांबे यांनी मारलेली असली तरी शुभांगी पाटील यांना मिळालेली मते बघता ‘हार के भी जितने वाले को बाजीगर कहते है’  हे हिंदी चित्रपटातील वाक्य त्यांना चांगल्या रित्या लागू पडते.

महाविकास आघाडीचा पाठिंबा नावालाच

खरंतर शुभांगी पाटील यांच्याकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून बघितलं जात होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ या नेत्यांनी जरी शुभांगी पाटील यांना पाठिंबा दर्शवलेला असला. तरी, यापैकी कुठलाही नेता ग्राउंडवर उतरून त्यांच्यासाठी मेहनत घेताना किंवा प्रचार करताना दिसून आला नाही. तीच परिस्थिती कार्यकर्त्यांची होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तर उघड सत्यजित तांबे यांच्यासोबत फिरत होते. त्यांचासाठी प्रचाराची यंत्रणा राबवण्यात आघाडी घेत होते. परिस्थिती संपूर्ण मतदारसंघांमध्ये दिसून आली. नाशिक जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी शुभांगी पाटलांसाठी नक्कीच प्रयत्न केला. मात्र, इतर जिल्ह्यांमध्ये तसे दिसले नाही, त्यामुळे शुभांगी पाटील जरी महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या तरी ही निवडणूक त्या एकट्याच लढताना दिसून आल्या.

कोण आहेत शुभांगी पाटील

शुभांगी पाटील या पेशाने शिक्षिका आहेत. त्या धुळ्याच्या भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बीए, डीएड, एमए, बीएड, एललबीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्या महाराष्ट्र टिचर्स असोसिएशन राज्य अध्यक्षा आणि संस्थापिका आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र स्टुडंट असोसिएशनच्या संस्थापिका अध्यक्षाही आहेत. महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या त्या प्रमुख सल्लागार आहेत. त्याशिवाय नंदूरबारच्या मोलगी येथील ग्रामविकास मंडळाच्या सचिवही आहेत. जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्था आणि धुळ्याच्या युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटीच्याही त्या अध्यक्षा आहेत.

सोशल मीडियावर परभवानंतरही जोरदार अभिनंदन

गुरवारी (दी.२) रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या मतमोजणीनंतर जेव्हा आकडेवारी समोर आली. आणि त्यात सत्यजित तांबे जरी विजयी झालेले असले तरी, शुभांगी पाटील यांना मिळलेल मतदान बघून अनेकांचे बोट तोंडात गेल्याशिवय राहिले नाही. ३९ हजार ५३४ इतका मोठा पल्ला त्यांनी गाठणे हे बहुतेकांच्या दृष्टीने अनपेक्षित होते. मात्र, निकाल समोर येताच सोशल मीडियावर ‘एक सामान्य घरातील महिला असूनही प्रस्थापितांच्या विरुद्ध झुंज देऊन इतक मोठ यश संपादन केल्याबद्दल त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव झाला. अनेकांनी त्यांना रणरगिनी ते थेट झाशीची राणी पर्यंतच्या उपमा देत सोशल मीडिया दणाणून सोडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -