राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग; दरड कोसळल्याने कोल्हापूर-राजापूर मार्ग ठप्प

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता कोकणासह, गोवा, कनार्टक या राज्यांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे

गेल्या आठ दिवसांपासून राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तसेच राज्यातील काही जिल्हांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर आलेला आहे. या पूरामुळे नदी लगतच्या शेतांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, आता कालपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असून पूर आलेल्या ठिकाणी हळूहळू पाणी कमी होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता कोकणासह, गोवा, कनार्टक या राज्यांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.

दरड कोसळल्याने कोल्हापूर-राजापूर मार्ग ठप्प
रत्नागिरी जिल्ह्यातील अणुस्कुरा घाटात आज पहाटे ५ वाजता दरड कोसळली असून सध्या कोल्हापूर-राजापूर मार्ग ठप्प झाला आहे.

पूर ओसरल्याने शेतकऱ्यांना दिलासा
राज्यात गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने काही जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण केली होती. मात्र, आता या भागात पावसाचा जोर कमी होऊ लागला असून शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे. दरम्यान, या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूर आल्याने तेथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे गडचिरोली, चंद्रपूर ,वर्धा तसेच नांदेड, हिंगोली या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसत आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, नवजा आणि कोयना परिसरात सध्या पाऊस सुरू आहे. दरम्यान, आता पावसाचा वेग ओसरलेला आहे.शिवाय कोल्हापूरमध्ये देखील गेल्या सात ते आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत होता. पंचगंगा नदीची पातळी देखील वाढू लागली होती. मात्र, पावसाचा जोर ओरसल्याने कोल्हापूरात पूर येण्याचा धोका टळलेला आहे.


हेही वाचा :मुंबईत वाऱ्यासह पावसाची बरसात ; पवई येथे दरड कोसळली