घरमहाराष्ट्रमहाविद्यालयातही मिळणार भगवद्गीतेचे धडे

महाविद्यालयातही मिळणार भगवद्गीतेचे धडे

Subscribe

मुंबई विभागाच्या उच्च शिक्षण संहसंचालकांनी शहरातील सर्व अशासकीय अनुदानित कॉलेजांना भगवद्गीतेचे संच घेण्याबाबत सूचना केली आहे. आता निर्णयामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे.

महाविद्यालयामध्ये भगद्गीता वाटप करण्याचा निर्णय मुंबई उच्च शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी शहरातील सर्व अशासकीय अनुदानित कॉलेजांना हा संच घेण्याबाबत पत्रक काढले आहे.
विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेचे वाचन करावे या उद्देशाने नॅकचे मुल्याकंंनप्राप्त अ आणि अ+ श्रेणी प्राप्त १०० महाविद्यालयामध्ये भगवद्गीता संचाचे वाटप केले जाणार आहे. हे वाटप संचालनालयाच्या माध्यमातून केले जाणार आहे. यामुळे संबंधित महाविद्यालयांनी हे संच घेऊन जावेत, असे आदेश उच्च शिक्षण मुंबईच्या सहसंचालकांनी दिले आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. भगवद्गीतेचे धडे देवून शिक्षण संचालकांना काय सिद्ध करायचे आहे, हा प्रश्न आता विचारला जात आहे.

Higher education department of Mumbai decision Bhagvad gita
मुंबई शिक्षण संचालक मंडळाने प्रसिद्ध केलेले पत्रक
साऱ्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्राचा बोजवारा उडालेला असताना सरकार अशा वादग्रस्त गोष्टी मुद्दाम करते आहे. शाळांमध्ये धार्मिक ग्रंथ वाटण्याच्या चुकीच्या प्रथा सरकारने पाडू नये. आम्ही भगवदगीतेच्या विरोधात नाही मात्र कॉलेजमध्ये ती वाटण्याची आवश्यकता नव्हती. बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापुढे थांबवावे.

– जयंत पाटील, आमदार

- Advertisement -

विद्यार्थी संघटनांकडून निर्णयाला विरोध

शैक्षणिक संस्थांमधील वातावरण धर्मनिरपेक्षतेचे असावे. शैक्षणिक संस्थेत एखाद्या धर्माचा प्रसार होऊ नये याबाबत सरकारने खबरदारी घ्यायची असते. मात्र आता प्रशासकीय यंत्रणाच धार्मिकता वाढण्यास पोषक ठरेल, असे निर्णय घेत आहे. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे मत प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. मनोज टेकाडे यांनी व्यक्त केले. तर राज्यातील पुरोगामी लोकांनी भारताला विद्वत्ता दिली आहे. नॅकचे मूल्यांकन अनेक महाविद्यालयांना मिळेल याची तरतूद करण्यापेक्षा त्यांना गीता देण्याचा निर्णय हास्यास्पद आहे, असे मत मनिवसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी व्यक्त केले.

प्रत्यक्षात सरकारने संविधानाची प्रत दिली असती तर हे राज्याचे पुरोगामीत्त्व आणखी ठळक करणारे उदाहरण ठरले असते. मात्र तसा विचार झाला नाही ही मोठी शोकांतिका असल्याचेही गांगुर्डे म्हणाले. दरम्यान, या संदर्भात उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

- Advertisement -

महाविद्यालयात भगवद्गीता वाटण्याच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी संमती दिली नसून छात्रभारती संघटनेने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -