सातपुड्यात वर्षभर सांभाळतात होळीची राख; पंधरा दिवस चालतो उत्सव

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील होळी उत्सवामध्ये नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रागांमध्ये होळी उत्सव तब्बल 15 दिवस चालतो. सात-आठ पाडे मिळून होळी साजरी केली जाते. सातपुड्यातील मानाच्या होळीचा मान हा काठी संस्थानला जातो. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असलेल्या ‘काठी’ या गावी मानाची राजवाडी होळी पेटवली जाते. आदिवासी राजे राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी या होळी उत्सवाला सुरुवात केली.

तापी आणि नर्मदेच्या कुशीत उभ्या ठाकलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेला लागून असलेले उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखले जाणारे नंदुरबार. आदिवासी ही महाराष्ट्रातील बहुसंख्येने असलेली एक मुख्य जमात. पावरा, पाडवी, गावित, भिल्ल या येथील प्रमुख आदिवासी जमाती. महाराष्ट्रातील सातपुडा आणि सह्याद्रीच्या हिरव्यागार शालू पांघरलेल्या दर्या-खोर्यात राहून आपल्या आदिम संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही लोक. बोलीभाषा, राहणीमान, दागिने, सण उत्सव, राणभाज्यांसारखी खाद्य संस्कृती, नृत्य, वाद्य यामाध्यमातून आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण करुन, या संपूर्ण गोष्टींची जपणूक ते आजतागायत करत आहेत. आपल्या गावापासून आजूबाजूच्या शहरी भागात किंवा प्रदेशात जाऊन मोल मजुरीची काम करुन आपल्या घरादाराच गुजराण करतात.

होळीची तयारी सुरू होते ती भोंगर्या बाजारापासून. होळीच्या साधारण पंधरा दिवस आधी भोंगर्या बाजाराला सुरुवात होते. दहा-बारा पाडे मिळून एक भोंगर्‍या बाजार भरतो. त्यासाठी आधी या गावांमधली लोक एकत्र जमून कोणत्या गावी हा बाजार भरवायचा याबाबत नियोजन करतात. आणि सर्वांच्या संमतीने या गावांच्या मध्यभागी असलेल्या एका गावात हा बाजार ठरवलेल्या दिवशी भरतो. या बाजारात होळीसाठी लागणारं सर्व साहित्य मिळते. होळी साजर्‍या होणार्‍या चौकात होळी उभारण्यासाठी खड्डा केला जातो. होळीच्या दिवशी काठी या गावी हा बांबू आणला जातो. गावातील वडाच्या झाडाजवळ ठेऊन त्याची संस्थानच्या यजमानांकडून पूजा केली जाते. यावेळी राजे उमेद सिंह यांच्या शस्रांचे आणि राजगादीचेदेखील पूजन केले जाते. तेथून हा बांबू गावातील हनुमान मंदिर, राम मंदिर, पीर बाबा दर्गा याठिकाणी विधिवत पूजा करुन होळीच्या ठिकाणी आणला जातो. पुन्हा त्याची पूजा करुन त्याला खोबर, हारकंगन, खजूर अडकवले जाते.

यानंतर याला आंब्याची आणि चांभळाची पाने गुंडाळली जातात. आणि मग खरी कसरत सुरू होते ती खणलेल्या खड्ड्यात हा उंच बांबू उभा करण्याची. हा बांबू खड्ड्यात उभारताना देखील कोणत्याही हत्यारांची मदत घेतली जात नाही.पहाटे पाच वाजेच्या सुमारास काठी येथील पहिली मानाची होळी लाखो आदिवासी बांधवांच्या साक्षीने पेटवली जाते. आणि पुन्हा तिच्या भोवती ताल धरत नृत्य केले जाते. होळी भोवती प्रदक्षिणा मारुन होळीतली राख आपल्या सोबत हे सर्व आदिवासी बांधव घरी नेतात. ती राख पुढच्या होळीपर्यंत आपल्या घरात जपून ठेवतात. सूर्योदयापूर्वी काठी येथील होळी पेटवून आदिवासी बांधव आपल्या घराकडे परततात. ज्यांनी नवस केलेला असतो असे लोक पुढील काही दिवस काकर्दे, मोलगी, तोरणमाळ, गौर्‍या, सुरवाणी, जामली, जमाना, धनाजे, मांडवी, सुरवाणी, बुगवाडा या ठिकाणी पायी जात तेथील होळी साजरी करतात. होळी ही दुःखातून सुखाचे क्षण आदिवासींच्या आयुष्यात आणते. अग्नीची पूजा करणारा आदिवासी हा खरा निसर्गपूजक म्हणून ओळखला जातो.