कोरोनाविरोधात लढाईसाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना ३ महिने मुदतवाढ

Ajoy Mehta and Uddhav Thackeary
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. पहिल्यांदा मुदतवाढ दिल्यानंतर अजय मेहता यांचा कार्यकाळ ३१ मार्च रोजी संपला होता. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजोय मेहता यांचा दीर्घ अनुभव पाहता आणि सध्या राज्य कोरोनाविरोधात लढाई लढत असताना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता करोनाच्या संकटातही त्यांची मदत सरकारला होईल याच हेतूने त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

वयोमानानुसार मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० सप्टेंबर २०१९ रोजी निवृत्त होणार होते. मात्र राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे त्यांना सहा महिने मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव पाठविला आणि केंद्रानेही त्याला तात्काळ मंजूरी देत सहा महिने मुदतवाढ दिली. सहा महिन्यांच्या मुदतवाढीनंतर अजोय मेहता हे ३१ मार्च २०२० रोजी निवृत्त होणार होते, मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा त्यांना तीन महिन्यांची मुदत वाढ मिळण्याचा प्रस्ताव मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच केंद्राकडे पाठवला होता. त्या प्रस्तावावर केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घेत आज त्यांना तीन महिने मुदतवाढ देण्याचा नवा निर्णय घेतला.

अजोय मेहता यांच्या निवृत्तीनंतर राज्याचे मुख्य सचिव पदाच्या स्पर्धेत अतिरीक्त मुख्य सचिव गृह संजय कुमार त्यानंतर महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि अतिरीक्त मुख्य सचिव (सामान्य प्रशासन) सीताराम कुंटे हे तीन अधिकारी ज्येष्ठतेनुसार मुख्य सचिव पदाच्या स्पर्धेत आहेत.

ajoy mehta

भारतात महाराष्ट्र हे करोनाचे केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता राज्यात प्रशासकीय पातळीवर अजोय मेहता यांचा अनुभव हा गरजेचा आहे. राज्यातील कोरोनाचे संकट कालावधीत म्हणूनच केंद्रातून अजोय मेहता यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. अजोय मेहता यांना तीन महिने मिळालेल्या मुदतवाढीमुळे आता ते येत्या ३० जून रोजी ते निवृत्त होतील. अजोय मेहता हे १९८४ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत.

याआधीच्या तीन महिन्यांच्या मुदतवाढीनुसार ते ३१ मार्च रोजी निवृत्त होणार होते. पण राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता त्यांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे. सद्यस्थितीला नव्या मुख्य सचिवांची प्रक्रिया पुर्ण करणे आणि नियुक्ती करणे अशक्य असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडूनच केंद्राकडे देण्यात आला होता. त्यामुळेच अजोय मेहता यांना मुदतवाढ देण्यास केंद्रानेही करोनाच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ दिली आहे.