घरमहाराष्ट्ररायगडमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू

रायगडमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराज पदाधिकार्‍यांची मनधरणी करण्यासोबतच विरोधी पक्षातील नाराजांना आपल्या पक्षात घेण्याचे प्रयत्न रायगड जिल्ह्यात युती व आघाडीच्या उमेदवारांकडून सुरू आहेत. शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस प्रकाश देसाई व दिवंगत काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश करून घेतला आहे, तर आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी त्यांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष माणिक जगताप व माजी आमदार मधुकर ठाकूर यांची मनधरणी करण्यात यश मिळविले असल्याचे दिसून येते.

32 रायगड लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीकडून शिवसेना नेते तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस, माजी मंत्री सुनिल तटकरे या दोन तुल्यबळ नेत्यांमध्ये पुन्हा एकदा लढत होत आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत अनंत गीते व सुनिल तटकरे हे दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या निवडणुकीत सुनिल तटकरे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. गाते यांना यावेळी 3 लाख 96 हजार 178 मते मिळाली होती तर तटकरे यांना 3 लाख 94 हजार 68 मते मिळाली. शेकाप उमेदवार रमेश कदम यांना 1 लाख 29 हजार 730 मतांवर समाधान मानावे लागले होते.

- Advertisement -

अनंत गीते व सुनिल तटकरे या दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. ठीकठिकाणी कार्यकर्ते मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. संपूर्ण मतदारसंघात फिरून दोन्ही उमेदवार आपल्या पक्षासह मित्रपक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. याचबरोबर नाराज पदाधिकार्‍यांची मनधरणी करण्यात येत ओह. तसेच विरोधी पक्षातील नाराजांना
आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्नही करण्यात येत आहेत.

शिवसेना-भाजपमध्ये इनकमिंग सुरू
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेत इनकमिंग सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस प्रकाश देसाई व दिवंगत काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले या दोघांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे, तर निवडणूक जाहिर होण्याच्या काही दिवस आधी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री रविंद्र पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या तिन्ही पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेना-भाजपची ताकद वाढली आहे.

- Advertisement -

आघाडीतील पदाधिकार्‍यांची मनधरणी करण्यात तटकरेंना यश
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप युती उमेदवार सुनिल तटकरे यांच्यासमोर नाराज काँग्रेस पदाधिकार्‍यांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान होते. माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप व काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकार्‍यांचे व सुनिल तटकरे यांच्यात सख्य नव्हते. काँग्रेस कार्यकर्ता बैठकांमध्ये याचे पडसादही उमटत होते. मात्र, मागील काही दिवसांत सुनिल तटकरे यांनी नाराज सर्व काँग्रेस नेते व पदाधिकार्‍यांची भेट घेत, त्यांची मनधरणी केली. परिणामी नाराज काँग्रेस पदाधिकारी व नेते आम्ही आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या पाठीशी असल्याची भाषा बोलू लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -