घरदेश-विदेशभारतात ३० लाख सिमकार्ड बनावट; मुंबईत ३० हजार तर तामिळनाडूत ५५ हजार,...

भारतात ३० लाख सिमकार्ड बनावट; मुंबईत ३० हजार तर तामिळनाडूत ५५ हजार, पोलीस तपास सुरू

Subscribe

 

मुंबईः भारतात सुमारे ३० लाख सिमकार्ड बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये तब्बल ५५ हजार तर मुंबईत ३० हजार बनावट सिमकार्ड जारी झाल्याचे समजते आहे. पोलीस याचा तपास करत आहेत.

- Advertisement -

केंद्रीय दूरसंचार विभागाने बनावट सिमकार्डबाबत माहिती देताच मुंबई पोलीस तातडीने कामाला लागले. पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली. यासाठी मुंबईतील व्हीपी रोड पोलीस स्टेशन, डीबी मार्ग पोलीस स्टेशन, मलबार हिल पोलीस स्टेशन, सहार पोलीस स्टेशन आणि बांगूरनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली. या पथकांनी शोध घेतल्यानंतर मुंबईतील ६२ जणांनी स्वत:चे फोटो वापरुन एकूण ८५०० सिमकार्ड जारी केल्याचा माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच गुन्हे नोंदवले आहेत. १३ जणांना अटक केली आहे. मिरारोड येथे पोलिसांनी ५२ सिमकार्ड जप्त केले. तेथील एका कॉल सेंटरमधून ही सिमकार्ड जप्त करण्यात आली.

व्ही.पी. रोड पोलिसांनी ३७८, डी. बी. पोलिसांनी १९० तर मलबार पोलिसांनी ६८५ सिमकार्ड जप्त केली. धक्कादायक बाब म्हणजे अब्दुल मन्सूरी या आरोपीने स्वतःचा फोटो वापरून ६८५ सिमकार्ड घेतले होते. त्याला मलबार पोलिसांनी अटक केली आहे. सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, दूरसंचार विभागाने भारतातील ३० लाख बनावट सिमकार्ड बंद केले आहेत. मुंबईत ३० हजार सिमकार्ड जारी करण्यात आली होती. त्याचा तपास सुरु आहे.

- Advertisement -

तामिळनाडू येथे सुमारे ५५ हजार बनावट सिमकार्ड बंद करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने माहिती दिल्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी तपास केला. या तपासात ५५ हजार सिमकार्ड बनावट असल्याचे कळाले. हे सर्व सिमकार्ड बंद करण्यात आले आहेत.

बनावट सिमकार्डचा वापर अतिरेकी कारवायांसाठी केला जातो. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांनी बनावट सिमकार्डचाच वापर केला होता. त्यातील एक सिमकार्ड मृत नागरिकाच्या नावे जारी झाले होते. त्यामुळे तपास यंत्रणा नेहमीच बोगस सिमकार्डचा शोध घेत असते.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -